बंगळुरु - कर्नाटकातील राजकीय उलथापालथ अद्याप सुरुच आहेत. वरिष्ठ काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी काँग्रेस आमदार आणि मंत्री नागराज यांची भेट घेतली. शिवकुमार यांनी त्यांना राजीनामा मागे घेण्याचे आवाहन केले. नागराज हास्तोके येथून आमदार म्हणून निवडून आले आहेत. नागराज आणि चिकबल्लूर येथील काँग्रेस आमदार डॉ. के. सुधाकर यांनी १० जुलैला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी हे राजीनामे तडकाफडकी एका रात्रीत स्वीकारण्यास नकार दिला होता. 'डॉ. के. सुधाकर आणि नागराज या आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मात्र, मी आतापर्यंत कोणाचेच राजीनामे स्वीकारलेले नाहीत. त्यामुळे या दोघांचे राजीनामे मी अशा प्रकारे अचानक स्वीकारू शकत नाही. मी त्यांना १७ तारखेची वेळ दिली आहे. मी योग्य प्रक्रियेच्या मार्गाने जाऊनच निर्णय घेईन,' असे कुमार यांनी बंगळुरु येथे पत्रकारांशी बोलताना म्हटले.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी १० बंडखोर आमदारांच्या याचिकेवर सुनावणी घेतली. न्यायालयाने लोकसभा अध्यक्षांना या आमदारांचे राजीनामे आणि अपात्र ठरवण्याविषयीचा निर्णय १६ जुलैपर्यंत राखून ठेवावा, असे निर्देश दिले आहेत.
अवघे १३ महिन्यांचे काँग्रेस-जेडीएस आघाडी कर्नाटकातील राजीनामा नाट्यामुळे अस्थिर बनले आहे. मागील आठवड्यात १० आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.