बंगळुरु - काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आघाडीने बहुमत गमावल्याचा दावा करत सोमवार हा दिवस त्यांच्यासाठी शेवटचा असणार असल्याचे कर्नाटक राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा म्हणाले.
सोमवारी या प्रकरणाचा काय तो निकाल लागेल आणि हे प्रकरण मार्गी लागेल, मला पूर्ण विश्वास आहे कि, सोमवार हा दिवस कुमारस्वामी सरकारचा शेवटचा दिवस असेल, असे येडीयुरप्पा म्हणाले.
मागच्या काही काळात काही बंडखोर आमदारांनी राजीनामे दिले होते. यातील दोन आमदारांनी राजीनामे मागे घेतले, पण नंतर यातील कागवाडचे काँग्रेसचे आमदार श्रीमंत पाटील अचानक गायब होत मुंबईच्या एका रुग्णालयात मिळाले. हेच कुमारस्वामी यांचे सरकार कोसळण्यामागचे मुख्य कारण आहे. सत्तारुढ पक्षाने व्हीप जारी केले असूनही ते विनाकारण आमदारांचा वेळ खात असल्याचा आरोप येडीयुरप्पा यांनी केला आहे.
सध्याची परिस्थिती पाहता १५ आमदारांनी विधानसभेच्या सत्रात उपस्थित न होता सध्या मुंबईतच राहावे. तसेच त्यांनी सभेला उपस्थित राहावे की, नाही हे परस्पर त्यांच्यावर अवलंबून आहे ते म्हणाले. राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करुन सत्तेत बहुमत येईपर्यंत महत्त्वाचे कोणतेही निर्णय न घेण्याचे म्हटले असल्याचे येडीयुरप्पा यांनी सांगितले. तसेच आत्तापर्यंत घेण्यात आलेले काही निर्णय लोकव्यवस्थेच्या विरुद्ध घेण्यात आले असल्याचेही ते म्हणाले.
माजी आमदार आणि काँग्रेस नेते के. एन. राजन्ना यांना काढून टाकून तुमकुरुमध्ये त्यांच्या जागी जिल्हा सहकारी बँकेच्या पदी एका प्रशासकाची नेमणूक करण्याचे शासनाने ठरविले असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्षांनी सांगितले.