बंगळूरू- कोरोनाच्या भीतीमुळे कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील एका व्यक्तीने आत्महत्या केली होती. त्याचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. उडुपी जिल्हा आरोग्य शल्यचिकीत्सक सुधीर चंद्र सोड्डा यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
गोपाळकृष्ण माडीवाला हे राज्य परिवनहन बस सेवेमध्ये नोकरीला होते. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची भीती त्यांना वाटत होती. कोरोनाच्या संसर्गामुळे आत्महत्या करत असल्याचे त्यानी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीमध्ये लिहले होते, अशी माहिती सोड्डा यांनी दिली.
घरातील सर्व व्यक्ती झोपल्यानंतर बुधवारी मध्यरात्री माडीवाला यांनी घराजवळील झाडाला दोरी बांधून फाशी घेत आत्महत्या केली. केएमसी मनिपाल रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागाने माडीवाला यास कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट केले असे सोड्डा यांनी सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार माडीवाला यांना मानसिक आजाराच्या समस्यांनी ग्रासले होते.
गोपाळकृष्ण माडिवाला यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतिही लक्षणे आढळून आली नाहीत, ते मानसिक आजाराच्या समस्यांनी ग्रस्त होते असे म्हटले. अशी माहिती सोड्डा यांनी दिली. उडुपी बंगळूरू पासून 405 किलोमीटर अंतरावर कर्नाटकच्या पश्चिम किनारपट्टीवर आहे.