हुबळी - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी येथील पोटनिवडणुकीसाठी आपल्या पक्षाचे सर्व १५ जागांवर उमेदवार असतील, असे सांगितले. तसेच, भाजपने पूरबाधित जिल्ह्यांमध्ये योग्य प्रकारे बचावकार्य केले नाही, असा शेराही त्यांनी मारला. कर्नाटकात ५ डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे.
'आम्ही सर्वच्या सर्व १५ जागांवर उमेदवार देऊ. राज्यातील पूरस्थितीमुळे १३ जिल्ह्यांमधील लोकांचे मोठे नुकसान झाले. त्यांना मदत करण्याचे माझे ध्येय आहे. जो पक्ष या लोकांना मदत करेल, त्यांना आम्ही पाठिंबा देऊ. सध्या लोक राज्य सरकारवर बचावकार्य ढिसाळपणे राबवल्यामुळे नाराज आहेत,' असे कुमारस्वामी म्हणाले. तसेच, भाजपला पाठिंबा देणार का, असे विचारले असता, त्यांनी स्पष्ट नकार दिला.
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीनंतर कुमारस्वामी मुख्यमंत्री बनले. त्यांनी १३ महिने काँग्रेससह युती सरकार चालवले. मात्र, काँग्रेस-जेडीएसच्या १५ आमदारांच्या राजीनाम्यांमुळे त्यांचे सरकार अल्पमतात येऊन त्यांना जुलैमध्ये मुख्यमंत्री पदाचा पदभार सोडावा लागला.
याआधी काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनीही जेडीएससह आघाडी करणार नसल्याचे म्हटले होते. 'काँग्रेसने सध्या रिक्त असलेल्या सर्व १५ जागा जिंकल्यास भाजप सरकार कोसळेल आणि मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागेल. मात्र, त्यानंतरही काँग्रेस कोणत्याही पक्षासोबत आघाडी करून सरकार स्थापन करणार नाही. असे झाल्यास कर्नाटकात नव्याने निवडणुका होतील,' असे ते म्हणाले होते.
याआधी कर्नाटकात २१ ऑक्टोबरलाच महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकांसह १५ मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार होती. मात्र, निवडणूक आयोगाने ही निवडणूक ५ डिसेंबरला होणार असल्याचे जाहीर केले. अथणी, कागवाड, गोकाक, येल्लापूर, हिरेकरूर, राणीबेन्नूर, विजयानगर, चिक्कबल्लापूर, के. आर. पुरा, येशवंतपुरा, महालक्ष्मी, शिवाजीनगर, होसाकोटे, कृष्णराजपेट, हुन्सूर या मतदारसंघांत सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल.