बंगळुरु - जेडीएसने राजीनामा देणाऱ्या पक्षातील ३ आमदारांची हकालपट्टी केली आहे. त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकारला विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरल्यानंतर सत्ता गमवावी लागली होती. गोपालय्या, एच. विश्वनाथ, नारायण गौडा अशी या आमदारांची नावे आहेत.
माजी विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी या आमदारांना अपात्र ठरवले होते. यानंतर पक्षाकडून ही कारवाई करण्यात आली.
या महिन्याच्या सुरुवातीला काँग्रेस-जेडीएसच्या युती सरकारविरोधात त्यांच्याच १४ आमदारांनी बंड पुकारत राजीनामे सादर केले होते. यानंतर २२५ सदस्यांच्या विधानसभेत कुमारस्वामी सरकार अल्पमतात गेले होते. यानंतर माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी राज्यपाल वजूभाई वाला यांच्याकडे राजीनामा सोपवला होता.
आता कर्नाटकात भाजप सरकार आल्यानंतर बी. एस. येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला.