बंगळुरू - अभिनेत्री कंगना रणौत विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कर्नाटकातील तुमकूरू जिल्हा न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. कृषी कायद्याविरोधात देशात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून कंगना रणौतने आंदोलक शेतकऱ्यांबाबत एक ट्विट केले होते. त्यावरून वाद निर्माण झाला होता.
रमेश नाईक या वकिलाने न्यायालयात कंगना रणौतविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावर न्यायाधीशांनी कंगनावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कैथसंदरा पोलिसांना दिले आहेत. फौजदारी संहिता कलम १५६(३) नुसार तक्रार दाखल झाली होती असे, न्यायालयाने सांगितले आहे.
काय होते कंगनाचे ट्विट?
कृषी कायद्याविरोधात देशात आंदोलन सुरू झाल्यानंतर कंगना रणौतने २१ सप्टेंबरला ट्विट केले होते. 'ज्या लोकांनी सीएए कायद्याबाबत चुकीची माहिती पसरवल्यामुळे दंगल झाली. तेच लोक आता कृषी कायद्याबाबत चुकीची माहिती पसरवत आहेत. त्यामुळे देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही खोटी माहिती पसरवणारे दहशतवादी आहेत', असे कंगना रणौतने ट्विट केले होते.