बंगळुरु - सध्या कर्नाटकात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. काँग्रेस आणि जेडीएस या परिस्थितीला भाजप जबाबदार असल्याचा दाव करत आहेत. तर, भाजपकडून या परिस्थितीला काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, सिद्धरामय्या यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. 'सर्वांनी पक्षाशी प्रामाणिक रहावे, माझ्याशी नव्हे,' असे त्यांनी म्हटले आहे.
'मी ४-५ आमदारांच्या संपर्कात आहे. सर्व तपशील उघड करू शकत नाही. मात्र, सर्वजण पक्षाशी प्रामाणिक आहेत. हा माझ्याशी प्रामाणिक राहण्याचा प्रश्न नाही. सर्वांनी पक्षाशी प्रामाणिक राहणे अपेक्षित आहे,' असे सिद्धरामय्या यांनी पत्रकारांना सांगितले.
कालच (शनिवार) भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ११ आमदारांनी राजीनामा देण्यामागे सिद्धरामय्या यांचा हात असल्याचे म्हटले होते. यानंतर सिद्धरामय्या यांचे स्पष्टीकरण समोर आले आहे.
'सध्याचे काँग्रेस-जेडीएस राजीनामा सत्र पक्षांतर्गत असंतोष आणि दुफळीमुळे झाले आहे. काँग्रेसमध्ये राज्य आणि राष्ट्रीय पातळ्यांवर अंतर्गत असंतोष आणि दुफळी माजली आहे. असमाधानामुळेच त्यांच्या आमदारांनी राजीनामे दिले. त्यांच्यातील काही जणांना सरकार सुरळितपणे चालू द्यायचे नाही,' असा दावा जोशी यांनी केला आहे. 'त्यांनी सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री बनायचे आहे. त्यामुळे त्यांची सध्याचे आघाडी सरकार चालू देण्याची इच्छा नाही,' असे म्हटले होते.
दरम्यान, काँग्रेस-जेडीएसच्या ११ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे सोपवले आहेत. त्यामुळे अवघे १३ महिन्यांचे आघाडी सरकार अस्थिर बनले आहे. राजीनामा देणाऱ्यांपैकी जेडीएसचे आमदार एच. विश्वनाथ यांनी एकूण १४ आमदारांनी राजीनामा दिल्याचा दावा केला आहे. मात्र, विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी अद्याप कोणताही राजीनामा संमत केलेला नाही. राजीनामा दिलेल्यांपैकी १० आमदार सध्या मुंबईत आहेत.