बंगळुरू - कर्नाटकचे वरिष्ठ काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना दिल्ली उच्च न्यायालयाने अवैध संपत्तीप्रकरणी जामीन मंजूर केला आहे. शिवकुमार यांचे शनिवारी बंगळुरु येथे आगमन झाले. यावेळी त्यांचे अडीचशे किलो सफरचंदाच्या माळेनं स्वागत करण्यात आले. जेडीएस नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी हेही त्यांच्या स्वागताला उपस्थित होते.
सफरचंदांच्या माळेला उचलण्यासाठी दोन क्रेनची मदत घेण्यात आली. यानंतर विमानतळावर उपस्थित हजारो कार्यकर्त्यांनी शिवकुमार यांचे स्वागत केले. यावेळी दोन क्रेनच्या मदतीने शिवकुमार यांना 250 किलो सफरचंदांचा हार घातला गेला.
उच्च न्यायालयाने शिवकुमार यांना 25 लाखांच्या जातमुचलक्यावर जामिन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्यांना भारत सोडून जाता येणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. तर जेव्हा गरज पडेल तेव्हा शिवकुमार यांना चौकशीला सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) अवैध संपत्तीप्रकरणी ३ सप्टेंबरला शिवकुमार यांना अटक केली होती. गेल्या वर्षी ईडीने त्यांच्या विरूद्ध आर्थिक गैरव्यवहार केल्याबाबत प्रकरण दाखल केले होते. कर चोरी, हवाला याप्रकरणी शिवकुमार यांच्याविरुद्ध प्रकरणे दाखल करण्यात आली होती. शिवकुमार काँग्रेसचे कर्नाटकातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनी कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस युती सरकार सुरळीत चालू ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.