नवी दिल्ली - कानपूरमध्ये झालेल्या चकमकीत पोलिसांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या विकास दुबेचा सध्या उत्तर प्रदेश पोलीस राज्यभरात शोध घेत आहे. कानपूरमध्ये अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर गोळीबार झाल्याच्या घटनेपासून दुबे फरार आहे. कुख्यात गुंड विकास दुबेला अटक करण्यासाठी त्याच्या साथीदारांची छायाचित्रे कानपूर पोलिसांनी जारी केली आहेत.
विकास दुबेने आपल्या घरात शस्त्रे लपवल्याची माहिती मिळाली होती. संपूर्ण घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून 2 किलो स्फोटक, 6 बंदुक, 15 देशी बॉम्ब, 25 काडतुसे जप्त करण्यात आली. दुबेला अटक करण्यासाठी आमच्या 40 टीम आणि एसटीएफ विभागाच्या टीम सातत्याने कार्यरत आहेत. विकास दुबे आणि त्याच्या सहकाऱ्यांना अटक करेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असे लखनऊ येथे आयोजित पत्रकार परिषदेत उत्तर प्रदेशचे अतिरिक्त महासंचालक प्रशांत कुमार म्हणाले. तसेच कानपूर एन्काऊंटरमध्ये जखमी झालेल्या लोकांची प्रकृती सुधारल्याचीही माहिती त्यांनी दिली.
पोलिसांनी विकास दुबेला अटक करण्यासाठी सगळीकडे छापेमारी सुरू केली आहे. कानपूर पोलिसांनी दुबे यांचे निकटवर्तीय असलेल्या जय बाजपेयी यांच्या घरीही छापा टाकला. मात्र त्याचा अद्याप सुगावा लागलेला नाही. पोलिसांनी विकास दुबेची माहिती देणाऱ्या इनामाची घोषणा केली होती. त्या रकमेत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. इनामाची रक्कम अडीच लाख करण्यात आली आहे.
कानपूरमधील बिक्रू खेडय़ात विकास दुबे याच्या टोळीवर जो छापा टाकताना झालेल्या चकमकीत पोलीस उपअधीक्षकासह आठ पोलिसांना जीव गमावावा लागला आहे. सध्या उत्तर प्रदेश पोलीस विकास दुबेचा शोध घेत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दुबेला पकडण्यासाठी यंत्रणा सक्रिय केली आहे.