नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. मात्र, यात दिलासादायक बाब म्हणजे, कोरोनाग्रस्त बरे होण्याचा दरही 31.15 टक्के वाढला आहे. आतापर्यंत 20 हजार 917 लोक पूर्णत: बरे झाले आहेत, तर 44 हजार 29 लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
गेल्या 24 तासांमध्ये 4 हजार 213 कोरोनाबाधित आढळले असून 1 हजार 559 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. एकूण कोरोनाबाधित हे 67 हजार 152 वर पोहोचले आहेत. तसेच 2 हजार 206 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरातमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत, तर सर्वांत जास्त महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्ण दगावले आहेत.
दरम्यान, डिस्चार्ज पॉलिसी बदलण्यात आली आहे. कारण, अनेक देशांनी त्यांच्या धोरणात लक्षणे आणि वेळेवर आधारित बदल केला आहे. याचप्रकारे आपणही थोडा बदल केला आहे. सुधारित धोरणानुसार किरकोळ स्वरुपाची लक्षणे आढळलेल्या कोरोना रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यापासून सलग ३ दिवसात एकदाही ताप आला नाही, श्वास घेण्यास त्रास जाणवला नाही, तर त्याला घरी पाठवता येईल. मात्र, अशा रुग्णाला घरी स्वतंत्र खोलीत क्वारंटाईन राहण्याचे सांगण्यात येईल.