जोधपूर - शहरातील घोडा चौक परिसरात एक चार वर्षांची मुलगी खेळता खेळता उघड्या गटारात पडली. मात्र, सुदैवाने जवळच काम करत असलेल्या व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तिचा जीव वाचला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली होती. चौकातील मुंद्रा भवन या इमारतीसमोर असलेली ही नाली, आठ फूट खोल आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे, की चार वर्षांची वैष्णवी तिथून जात असताना अचानक तिचा पाय नाल्यात पडतो, त्यामुळे ती खाली पडते. तिथून उठण्याचा प्रयत्न करत असताना, ती पूर्णपणे नाल्यामध्ये पडते. तेवढ्यात शेजारीच काम करत असलेले ज्योतीराम पाटील, हे चपळाईने धावत येत, तिला नाल्यात बुडण्यापासून वाचवतात.
हेही वाचा : केरळच्या महिला पोलीस अधिकाऱ्याने कर्करोग ग्रस्तांसाठी केसांचे दान, पाहा व्हिडिओ
एका स्थानिकाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार ते पाच दिवसांपासून परिसरातील लोकांना या उघड्या गटारामुळे त्रास होतो आहे. रस्ते बांधकाम विभागाने खड्डे खणल्यानंतर अर्ध्यातूनच काम सोडून दिले आहे. याविषयी याआधी तक्रार करून देखील कोणीही त्याची गांभीर्याने दखल घेत नाहीये.
दरम्यान, ज्योतीराम यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
हेही वाचा : फोटोशूट तर अप्रतिम झाले; तरीही सोशल मीडियावरून मॉडेल ट्रोल