रांची : बिहार विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात आता झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम)ही उतरला आहे. ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे पक्षाचे सरचिटणीस सुप्रिओ भट्टाचार्य यांनी जाहीर केले आहे. बिहारमधील सात जागांवर जेएमएम निवडणूक लढवणार आहे.
राजद आम्हाला काही जागा देईल, अशी आम्हाला आशा होती. मात्र, राजदच्या 'मक्कारी'मुळे आम्हाला आता असा निर्णय घ्यावा लागत आहे. बिहारमधील सात जागांवर आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार आहोत, असे भट्टाचार्य यांनी सांगितले.
झारखंडमधील राजद-जेएमएम युतीवर याचा परिणाम होईल का, असे विचारले असता भट्टाचार्य म्हणाले की झारखंडमध्ये आम्ही राजदला भरपूर आदराने वागवले आहे. राजद जेवढ्या जागांसाठी पात्र होते, त्याहून अधिक जागा आम्ही त्यांना दिल्या होत्या. मात्र, बिहारमध्ये त्यांनी शिष्टाचार पाळला नाही.
एनडीए युतीमध्ये भाजप, लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) आणि जनता दल युनायटेड (जदयू) होते. मात्र, एलजेपीने भाजप विरोधात जरी उमेदवार देणार नसले, तरी जदयू विरोधात उमेदवार उभे करणार असल्याचे घोषित केले आहे. तर, हिंदुस्तान आवाम मोर्चा (एचएएम)चे प्रमुख जितन राम मांझी हे एनडीएमध्ये गेले आहेत.
बिहारमध्ये २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबरला मतदान पार पडेल, तर दहा नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
हेही वाचा : बिहार विधानसभा निवडणूक : भाजपची पहिली यादी जाहीर; २७ जागांवर उमेदवार निश्चित