श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. ही चकमक दक्षिण काश्मीरमधील जिल्ह्यातील यारीपोरा भागामध्ये सुरू आहे. काश्मीर पोलीस, ३४ राष्ट्रीय रायफल्स आणि केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या जवानांकडून संयुक्त कारवाई करण्यात येत आहे.
दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर संयुक्त पथकाने यारीपोरा परिसराला वेढा दिला. त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु असल्याच्या वृत्ताला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. दोन किंवा तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली आहे. लष्कराचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे.