हजारीबाग - झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात एनटीपीसी दगडी कोळशाच्या खाणीत आग लागली. पकरी बरवाडी येथे कोल डम्पमध्ये १.५ लाख टन कोळशाचा साठा आहे. याला जवळपास एका आठवड्यापूर्वी आग लागली आहे. येथे 'मां अंबे कंपनी' कोळसा डम्प करते.
तापमानात अचानक झालेली वाढ हे कोळशाला आग लागण्याचे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. ही एक प्राकृतिक घटना असल्याचे एनटीपीसीच्या मायनिंग इंजिनिअरचे म्हणणे आहे. 'जेव्हा तापमान वाढते, तेव्हा पहिल्यांदा पाऊस पडल्यानंतर अशा प्रकारची घटना घडते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. आतापर्यंत जवळजवळ २ हजार टन कोळसा जळून गेला आहे. क्रमबद्ध पद्धतीने ही आग विझवली जात आहे,' असे ते म्हणाले.
'आग लागल्यानंतर उरलेला कोळसा ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून औष्णिक विद्युत केंद्रावर पाठवण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक प्रकारची यंत्रे लावण्यात आली आहे. ३ दिवसांच्या आत आग नियंत्रणात येईल. सध्या आगीत कोळसा जळाल्यामुळे सुमारे १० ते १५ लाखांचे नुकसान झालेले आहे,' असे सांगण्यात आले आहे.