लातेहार - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी झारखंडच्या लातेहारमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना 'अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर बनेल,' असे सांगितले. देशातील प्रत्येकाची येथे राम मंदिर बनायला हवे, अशी इच्छा आहे. मात्र, यामध्ये काँग्रेसने वारंवार अडचणी आणल्या. काँग्रेसने हा खटला पुढे चालू दिला नाही.
'भाजप संवैधानिक मार्गाने अयोध्येतील राम मंदिराचा वाद सोडवू इच्छित होता. आता या प्रकरणात न्यायालयाचा निर्णय आला आहे. यामुळे गगनचुंबी राम मंदिराचे निर्माण होण्याचा मार्ग सुकर झाला आहे,' असे शाह यांनी म्हटले.
शाह यांनी उपस्थित लोकांना 'त्यांना अयोध्येत राम मंदिर हवे आहे आहे का,' असा प्रश्न केला. यावर सर्वांनी होकार देत राम मंदिराच्या निर्माणाच्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले.
काश्मीर मुद्द्यावर शाह म्हणाले
शाह यांनी काश्मीरचाही मुद्दा उपस्थित केला. त्यांनी 'काश्मीरची समस्या नरेंद्र मोदी सरकारनेच सोडवली' असल्याचे म्हटले. हे प्रकरण 70 वर्षांपासून प्रलंबित होते. मात्र, आमच्या सरकारने आर्टिकल 370 हटवून तेथे विकासाचा मार्ग मोकळा केला. दुसऱ्या बाजूला दहशतवाद्यांचा प्रवेशमार्गही बंद केला. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी 'स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षांत काँग्रेसने आदिवासींसाठी काय केले, हे देशाला सांगावे,' असे शाह म्हणाले.
झारखंडविषयी काय म्हणाले शाह
शाह यांनी झारखंडच्या विकासासाठी भाजपला मत देण्याचे आवाहन केले. त्यांनी या वेळी, लातेहार या क्रांतिकारकांच्या भूमीला नमन करत असल्याचे ते म्हणाले. शाह यांनी 1857 च्या स्वातंत्र्यलढ्याचा उल्लेख केला. सर्व देश इंग्रजांशी लढत असताना पलामू येथील लोकांनी जाती-धर्म मागे सोडून देत क्रांतीची मशाल पेटती ठेवली, असे शाह म्हणाले. शाह यांनी भाजपला पूर्ण बहुमत देण्याचे आवाहन केले.