नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर पथदिेवे बंद करून पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती समोर येत आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्धी परिषदेचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. त्यासाठी आज विद्यार्थ्यांनी मोर्चाचे आयोजन केले होते. त्यानुसार हा मोर्चा संसदेकडे वाटचाल करत होता. मात्र, पोलिसांनी त्यांना बेर सराई रस्त्यावर रोखले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी तेथेच आंदोलन सुरु केले होते.
यादरम्यान, पोलीस आणि विद्यार्थ्यांदरम्यान संघर्ष झाला.त्यात पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तर, लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी केली जाईल अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. या पार्श्वभूमीवर, संसदेच्या आवारात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तर, जेएनयू विद्यापिठातही मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. विद्यापीठातील शुल्कवाढीसह इतर मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
दरम्यान, केंद्रीय शिक्षण सचिव आर. सुब्रमण्यम यांनी एक उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. जेएनयूमधील कामकाज पूर्ववत व्हावे यासाठी ही समिती नियुक्त करण्यात आली आहे. प्रा. व्ही. एस. चौहान (यूजीसीचे माजी अध्यक्ष), प्रा. अनिल सहस्त्रबुद्धे (एआयसीटीईचे अध्यक्ष) आणि प्रा. रजनीश जैन (यूजीसी सचिव) या तिघांचा समावेश या समितीमध्ये आहे.
हेही वाचा : महाराष्ट्राला नैसर्गिक आपत्तीग्रस्त राज्य घोषित करा; शिवसेनेचे संसदेबाहेर आंदोलन