नवी दिल्ली : आज पहिलाच जागतिक 'निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवा' दिवस आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर हे आज एका वेबिनारमध्ये सहभागी होतील. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.
स्वच्छ हवा सर्वांचा अधिकार आहे. स्वच्छ हवेअभावी जगभरात दरवर्षी लाखो लोकांचे मृत्यू होता. विविध आजार जडतात. यासंबंधी इशारा देणारे अनेक अहवालही प्रकाशित झाले आहेत. मात्र, पाहिजे तेवढी जनजागृती झालेली नाही. संयुक्त राष्ट्राच्या ७४व्या आमसभेने डिसेंबर २०१९मध्ये ७ सप्टेंबर हा 'क्लिन एअर फॉर ब्लू स्काय' जाहीर केला. निळं आकाश, स्वच्छ हवा सर्वांना मिळावी ही भावना यामागे आहे.
वायू प्रदूषण कमी करण्यासाठी, त्याला आळा घालण्यासठी ७ सप्टेंबर हा दिन जगभरात या वर्षीपासून साजरा केला जातोय. यावर्षी संपूर्ण जगावर कोरोनाचं सावट आहे. मात्र, तरीही ऑनलाइन, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे, व्हर्च्युअल माध्यमातून कार्यक्रम घेत जनजागृती करण्यात येत आहे.
दरम्यान, २०१९च्या जानेवारीमध्ये केंद्राने 'नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम'ची (एनसीएपी) घोषणा केली होती. आजच्या वेबिनारमध्ये जावडेकर एनसीएपीच्या आतापर्यंतच्या कामाचाही आढावा घेणार आहेत. या वेबिनारला देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शहरी विकास विभाग आणि पर्यावरण विभागाचे सचिव उपस्थित राहतील. तसेच, एनसीएपीने ज्या १२२ शहरांचा विकास केला आहे, त्यांचे आयुक्तही या वेबिनारला हजेरी लावणार आहेत.
हेही वाचा : 'निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवा'....वायू प्रदुषण रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिन