बारामुल्ला (जम्मू-काश्मीर) - पाकिस्तानने आज सलग तिसऱ्या दिवशी बारामुल्ला जिल्ह्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. आज(रविवारी) सकाळी पाकिस्तानकडून रामपूर सेक्टरमध्ये अचानक गोळीबार झाला तसेच मोर्टारही दागण्यात आले. भारतीय सेनेकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसात रामपूर सेक्टरमध्ये दुसऱ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.
शनिवारी सकाळी पाकिस्तानी सैनिकांनी पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेच्या बाजूला गोळीबार केला. या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला आणि दोन जण जखमी झाले.
शनिवारी संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले, की पाकिस्तानने शुक्रवारी बारामुल्ला जिल्ह्यातील रामपूर सेक्टरमध्ये गोळीबार केला. या हल्ल्यात सैन्यातील एक जवान आणि अख्तर बेगम या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. तर अन्य एक नागरीक आणि २३ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या या गोळीबारात चार निवासी घरे आणि मशिदीचे नुकसान झाले आहे. विविध कुटुंबांनी भूमिगत सुरक्षा बंकरमध्ये आणि उरीच्या इतर सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे.
दरम्यान, शनिवारी रात्री शहापूर-केरणी सेक्टर गोळीबार झाला. याला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच शुक्रवारीच बारामुल्ला जिल्ह्यातदेखील पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. त्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला तर एक नागरिक जखमी झाला.