श्रीनगर - लश्कर-ए-मुस्तफा या दहशतवादी संघटनेचे प्रमुख हिदायतुल्ला मलिकला जम्मू आणि अनंतनाग पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जम्मूमधून अटक केली. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-मुस्तफाचा हा दहशतवादी काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदचा टॉपचा कमांडर आहे.
हिदायतुल्ला मलिककडून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. आम्ही त्याला अटक करण्यासाठी गेलो होतो. तेव्हा त्याने आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असे जम्मूचे एसएसपी श्रीधर पाटील म्हणाले.
शुक्रवारीही एका दहशतवाद्यास अटक -
जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा सक्रिय सदस्य आणि पाकिस्तानात दहशतवाद्यांसोबत काम करणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या मुनीब सोफीला दिल्ली विमानतळावरून शुक्रवारी अटक करण्यात आली होती. मुनीब सोफीला कुलगाम पोलिसांच्या पथकाने दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावरून अटक केली. मुनीब हा जम्मू काश्मीरमधील बिजबेहारा येथील रहिवासी आहे.