नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कार्यक्रमावरून दिल्लीत पेटलेले आंदोलन अजूनही शमलेले नाही. जामिया मिलिया विद्यापीठ आणि शाहीन बाग परिसरात आंदोलकांनी 'जेल भरो' आंदोलन सुरू केले आहे. यावेळी नागरिकांनी पोलिसांच्या कारावाईचाही निषेध केला.
मागील १७ दिवसांपासून शाहीन बाग आणि जामिया मिलिया विद्यापीठ परिसरात सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन सुरू आहे.
हेही वाचा - 'उत्तर प्रदेश सरकारने अमानुषतेच्या सर्व सीमा पार केल्या', प्रियांका गांधींचे टि्वट
सरकार नागरिकांवर रोज नवा कायदा लादत आहे
सीएए आणि एनआरसी विरोधात स्वत:ला अटक करुन घेण्यास आलेला फैज उर रहमान म्हणाला की, सरकार रोज नवीन कायदा नागरिकांवर लादत आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याविरोधात आंदोलन करणाऱ्या जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानुष अत्याचार केले. पोलिसांनी केलेले हे कृत्य पूर्णत: चुकीचे आहे. उत्तरप्रदेशातही पोलिसांनी आंदोलकांना मारहाण केली आणि गोळीबारही केला.
हेही वाचा - भारतीय नौदल बनवणार सहा आण्विक आणि १८ पारंपरिक पाणबुड्या
प्रशासन अरेरावी करत आहे
पोलीस आणि सरकार ज्या पद्धतीने आंदोलकांवर कारवाई करत आहे, त्यातून प्रशासनाची अरेरावी दिसून येत आहे. ज्या पद्धतीने आंदोलकांवर कारवाई होत आहे, असे वाटतच नाही, देश स्वतंत्र झाला आहे. पोलिसांच्या या कारवाई विरोधात आम्ही स्वत:ला अटक करुन घेण्यासाठी पोलीस ठाण्यात आलो आहोत. जोपर्यंत सरकार आपला निर्णय माघारी घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असे आंदोलकांनी सांगितले.