श्रीनगर - जम्मू काश्मीर पोलीस आणि राष्ट्रीय रायफल्सने मागील 18 तासात संयुक्त ऑपरेशन राबवत ८ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मेजर जनरल ए. सेनगुप्ता यांनी याबाबत माहिती दिली. एका दहशतवाद्याने शरणागती पत्करली असून गुप्त माहितीच्या आधारे अचूक कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
'शुक्रवारपासून मागील १८ तासांत गुप्त माहितीच्या आधारे दोन वेगवेगळे ऑपरेशन राबविण्यात आले. यात आम्हाला आठ दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले. एका दहशतवाद्याने शरणागती पत्करली आहे', असे मेजर जनरल सेनगुप्ता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
काश्मिरी तरुणांची दिशाभूल होतेय...
तरुणांची दिशाभूल करून पाकिस्तानातील हस्तक काश्मीरातील तरुणांना दहशतवादी बनवत आहेत. आठ जणांपैकी ज्या सात जणांना मारण्यात आलं आहे ते २०२० साली दहशतवादी संघटनेत भरती झाले होते. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी खोटी आश्वासने देऊन त्यांना भरती करून घेतले होते. दहशतवादी संघटनांमध्ये नेतृत्वाची कमतरता भासत असून तरुणांची भरती करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत, असे सेनगुप्ता यांनी सांगितले.
निश्चितच दहशतवाद्यांमध्ये नेतृत्वाची कमतरता आहे. त्यामुळे दहशतवादी कारवाया कमी झाल्या आहेत. तरुणांची दिशाभूल करण्याचा त्यांचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. स्थानिक नागरिकांना त्रास देण्याचं काम त्यांनी सुरू केल्याचं सेनगुप्ता यांनी सांगितलं.
काश्मीर पोलिसांनुसार, दक्षिण काश्मिरातून यावर्षी ८० तरुण दहशतवादी संघटनांत सहभागी झाले, असे पोलीस उपमहानिरिक्षक अतुल गोयल यांनी सांगितले. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी स्थानिक नागरिकांवर आणि जवानांवर हल्ले केले होते, असे सेनगुप्ता म्हणाले.