श्रीनगर - जैश-ए- मौहम्मद दहशतवादी संघटनेच्या चार हस्तकांना सुरक्षा पथकांनी अटक केली आहे. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागातून पोलिसांनी चौघांना अटक केली. काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असताना लष्कर आणि पोलिसांनी दहशतवादी संघटनांचे जाळे उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे काश्मीर पोलीस, लष्करातील राष्ट्रीय रायफल्स आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी संयुक्त कारवाई करत अवंतीपोरा भागातून चार दहशतवाद्यांच्या हस्तकांना अटक केली, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ईटिव्ही भारतशी बोलताना सांगितले.
आक्षेपार्ह साहित्यासह पैस, दारुगोळा आणि स्फोटकेही जप्त
या चौघांकडून आक्षेपार्ह साहित्यासह पैस, दारुगोळा आणि स्फोटकेही जप्त करण्यात आली आहेत. दहशतवाद्यांना आसरा देण्यासह साहित्य पुरवठा चौघांकडून करण्यात येत होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
शाबीर अहमद पराय, शिराझ अहमद दार, शफात अहमद मीर आणि इश्फाक अहमद शहा अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. हे सर्वजण पुलवामा जिल्ह्यातील खेरवा परिसरातली बाथेन या गावातील आहेत, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने ईटीव्ही भारतला दिली.