नवी दिल्ली - ऑलिम्पिक खेळ भारतात व्हावेत हे माझं स्वप्न आहे, असे फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेड (एफएसडीएल) च्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी म्हटले आहे. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. यावेळी सभेला संबोधीत करताना त्या म्हणाल्या.
ऑलिम्पिक खेळ भारतात व्हावेत हे माझं स्वप्न आहे. भारतातील एथलिट्सना जागतिक स्तरावर उत्तम कामगिरी करताना मला बघायचं आहे, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान निता अंबानी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्याही (आयओसी) सदस्य आहेत. समितीचे सदस्यत्व मिळवणाऱ्या नीता अंबानी ह्या पहिल्या भारतीय महिला आहेत. तळागाळातील खेळाडूंना तयार करण्यासाठी, नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखालील पायाभूत संस्था अनेक शैक्षणिक व क्रीडा प्रकल्प राबवतात, ज्यात लाखो मुले जोडली गेलेली आहेत.
याआधीही नीता अंबानी यांनी भारतीय खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत, जे कौतुकास्पद आहेत. त्यानी महिला फुटबॉलपटूंना प्रचंड मदत केली आहे.