बंगळुरु - कर्नाटक भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपाचे काही आमदार विद्यमान मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचा दावा काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे. येडियुरप्पा यांच्या सरकारमध्ये सर्व काही ठीक नसल्याची तक्रार काही भाजपा आमदारांनी माझ्याकडे केल्याचे सिद्धरामय्या यांनी सांगितले.
सरकारमध्ये मतभेद आहेत. त्यांचे आमदार मला भेटले. त्यांनी माझ्याकडे तक्रार केली की, भाजपामध्ये सर्व काही ठीक नाही. येडियुरप्पा फक्त नावासाठी मुख्यमंत्रीपदावर आहेत. मात्र, प्रत्यक्षात त्यांचा मुलगा विजयेंद्र काम करत आहेत, असे सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कोरोना विषाणूच्या संकटाकाळात येडियुरप्पा यांनी पूर्ण क्षमतेने काम केले नाही. येडियुरप्पा यांचे काम मुलगा विजयेंद्र करत असून ते सरकारच्या दैनंदिन कारभारात हस्तक्षेप करत आहेत. मात्र, विजयेंद्र यांचा प्रशासनातील हस्तक्षेप आमदारांना रुचला नसून ते नाराजी व्यक्त करत आहेत. पक्षातील आमदार विजेंद्र यांना "असंवैधानिक मुख्यमंत्री" म्हणत असल्याचे सिद्धरामय्या यांनी सांगितले.
मे महिन्यात कर्नाटक भाजपामधील काही आमदारांची बैठक पार पडली होती. त्यानंतर राज्यात पर्यायी नेतृत्व उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चांना वेग मिळाला आहे.