अहमदाबाद - मागील सहा ते सात महिन्यांपासून जगभरासह भारतात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन करण्यात आले होते. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून रेल्वेने विशेष रेल्वेच्या नावाने काही मार्गावर रेल्वे सेवा सुरू केली आहे. अहमदाबाद ते मुंबई दरम्यान चालणाऱ्या तेजस एक्सप्रेसला ही याचा फटका बसला होता. ही सेवा मागील सात महिन्यांपासून बंद होती. ती सेवा आज शनिवारपासून सुरू होणार आहे.
आज सकाळी 06:40 वाजता पहिली तेजस एक्सप्रेस अहमादाबाद येथून मुंबईसाठी रवाना झाली असून ती मुंबई येथे दुपारी 01:10 वाजता पोहोचणार आहे. सद्या सणासुदीचा काळ सुरू असून यामुळे प्रवाशांची ही एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी होती, ती रेल्वेने पूर्ण करुन प्रवाशांना दिलासा दिला आहे.
आयआरसीटीसीने दिलेल्या माहितीनुसार, या गाड्या अत्याधुनिक सोई-सुविधांनी सज्ज आहेत. तसेच प्रवासा दरम्यान कोविड १९ च्या सरकारने दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करण्याच्या सुचना प्रवाशांना देण्यात आल्या आहेत. रेल्वेकडून यातील प्रवाशांना कोविड १९ प्रोटेक्शन कीट देण्यात येणार आहे. या किटमध्ये हँड सॅनिटाईझची बॉटल, एक मास्क, एक फेस शिल्ड आणि एक हातमोज्याची जोडी याचा समावेश आहे.
तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना प्रवेश देण्याअगोदर सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग आणि हँड सॅनिटाईज करण्यात येणार आहे. प्रवाशांना एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर बसण्यास मनाई करण्यात आले आहे. प्रवाशांना आरोग्यसेतू अॅप डाऊनलोड करण्याची सक्ती करण्यात आली आहे. रेल्वेकडून कोच, पँटरी कार आणि स्वच्छातगृहे सॅनिटाईज करणार आहे. एक्सप्रेसमध्ये फिजकल डिस्टन्सिंग मेंटेन करण्यासाठी दोन प्रवाशांमधील एक जागा रिकामी ठेवण्यात येणार आहे.
नवरात्रीचे दिवस असल्याने रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी गरम अन्न पदार्थांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच नवरात्रीचा उपवास असणाऱ्यांसाठी खास पदार्थ आणि जैन फुडही उपलब्ध ठेवण्यात आले आहे. या रेल्वेत एकूण २०० प्रवाशांना एकावेळी प्रवेश देण्यात येणार आहे. ही सेवा मार्च २०२० पासून कोरोनामुळे बंद ठेवण्यात आले होते.