नवी दिल्ली - आयएनएक्स माध्यम व्यवहार प्रकरणी पी. चिदंबरम यांच्या विरोधात सीबीआयने 'लुकआऊट नोटीस' नोटीस जारी केली आहे. याप्रकरणी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी चिदंबरम यांना पाठींबा दिला आहे. चिदंबरम यांची प्रतिमा खराब करण्यासाठी मोदी सरकार सीबीआयचा चुकीचा वापर करत आहे, असे राहुल गांधी यांनी तर आम्ही चिदंबरम यांच्या सोबत असून सत्यासाठी लढत राहू, असे प्रियंका गांधी यांनी टि्वट करून म्हटले आहे.
मोदी सरकार ईडी आणि सीबीआय आणि माध्यमांचा चूकीचा वापर करत असून चिदंबरम यांची प्रतिमा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. सत्तेचा चुकीचा वापर करण्याच्या या पद्धतीचा मी निषेध करतो, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.
आम्ही चिदंबरम यांच्या सोबत असून सत्यासाठी लढत राहू, मग निर्णय कोणताही येवो. चिदंबरम यांनी त्यांच्या राजकीय जीवनात आणि केंद्रीय मंत्री असताना देशासाठी योगदान दिले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आवाज उठवल्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई केली जात आहे, असे प्रियंका गांधी यांनी टि्वट करून म्हटले आहे.
काय आहे आयएनएक्स माध्यम व्यवहार प्रकरण?
आयएनएक्स माध्यम व्यवहार पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना २००७ मध्ये झाला होता. यामध्ये आयएनएक्स या माध्यम समूहाला ३०५ कोटींची परदेशी गुंतवणूक मिळवून देण्यासाठी 'इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्ड' तर्फे मंजुरी देण्यात आली होती. ही मंजुरी देताना गैरव्यवहार केल्याचा ठपका चिदंबरम यांच्यावर आहे. १५ मे २०१७ ला सीबीआयने याप्रकरणी खटला दाखल केला आहे. तर २०१८ मध्ये सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रिगचा खटला दाखल केला आहे.