नवी दिल्ली - दिल्लीच्या एका न्यायालयाने पी. चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. आयएनएक्स मीडिया प्रकरणात, चिदंबरम हे सीबीआयच्या ताब्यात आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर आता, ते २ सप्टेंबर पर्यंत सीबीआयच्या चौकशीला तोंड देतील.
अजय कुमार कुहार या विशेष न्यायाधीशांनी हा आदेश दिला आहे. २१ ऑगस्टला अटक झाल्यापासून, सीबीआयकडून चिदंबरम यांची याआधी आठ दिवस चौकशी करण्यात आली होती.
चौकशी करणे हा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचा विशेष हक्क आहे. कागदपत्रे, पुरावे हे विपुल प्रमाणात आहेत. त्यामुळे, आरोपीची अधिक चौकशी होणे आवश्यक आहे. हे सर्व लक्षात घेता, आरोपीच्या कोठडीत २ सप्टेंबर पर्यंत वाढ करण्यात येत आहे. असे मत न्यायाधीशांनी व्यक्त केले आहे.
चिदंबरम यांच्यावर आयएनएक्स मीडिया प्रकरणात ३०५ कोटीं रुपयांचा भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे. आयएनक्स मीडिया ही पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जीची कंपनी आहे. हे दोघेही सध्या शीना बोरा हत्याप्रकरणात तुरुंगात आहेत. आयएनएक्स मीडियामधील परकीय गुंतवणुकीचा प्रस्ताव परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (एफआयपीबी) स्वीकारला होता. त्यापाठोपाठ अर्थमंत्रालयाने १८ मार्च २००७ रोजी ४ कोटी ६४ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीला मान्यता दिली होती.