मुंबई - राज्यात रेल्वे प्रवासाला बंदी असल्यामुळे एक जूनपासून सुरू होणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये राज्यांतर्गत तिकिटांचे आरक्षण करता येणार नाही, अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे. जिल्ह्यांतर्गत प्रवासी रेल्वे सेवा बंद असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ज्या प्रवाशांनी राज्यामधील शहरांची तिकिटे आरक्षित केली आहेत, त्यांचे आरक्षण रद्द करण्यात येणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने एक जूनपासून प्रवासी रेल्वे सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच, मंत्रालयाने सुरू होणाऱ्या २०० गाड्यांची यादीही जाहीर केली आहे. या गाड्यांचे मार्ग, वेळ आणि थांबे पूर्वीप्रमाणेच राहतील. तसेच यासाठी केवळ ऑनलाईन आरक्षण करता येणार आहे. अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली होती.
गाड्यांचे थांबे पूर्वीप्रमाणेच असल्यामुळे अनेक नागरिकांनी राज्यामधील शहरांमध्ये जाण्यासाठी तिकिटांचे आरक्षण केले होते. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयानंतर आता त्यांचे आरक्षण रद्द होणार आहे. केवळ राज्याबाहेर जाणाऱ्या नागरिकांचेच आरक्षण कायम ठेवण्यात येणार आहे. राज्यसरकारकडून पुढील सूचना मिळेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
मुंबईहून सुटणाऱ्या गाड्यांची यादी पुढीलप्रमाणे..
- सीएसएमटी (मुंबई) - भुवनेश्वर (कोनार्क एक्सप्रेस)
- लोकमान्य टिळक (टी) - दरभंगा (दरभंगा एक्सप्रेस)
- लोकमान्य टिळक (टी) - वाराणसी (कामायणी एक्सप्रेस)
- सीएसएमटी - वाराणसी (महानगरी एक्सप्रेस)
- सीएसएमटी - गडग
- सीएसएमटी - केएसआर बेंगळुरू (उदयन एक्स्प्रेस)
- सीएसएमटी - हैदराबाद (हुसैन सागर एक्सप्रेस)
- बांद्रा - जोधपूर (सूर्यनगरी एक्सप्रेस)
- मुंबई सेंट्रल - अहमदाबाद (कर्णावती एक्सप्रेस)
- मुंबई एलटीटी - तिरुवअनंतपुरम सेंट्रल (नेत्रावती एक्सप्रेस)
- मुंबई सेंट्रल - जयपूर
- बांद्रा - गाझियापूर
- लोकमान्य टिळक (टी) - पाटलीपुत्र
जनशताब्दी गाड्या..
- बांद्रा - गोरखपूर (अवध एक्सप्रेस)
- बांद्रा - मुझफ्फरपूर (अवध एक्सप्रेस)
हेही वाचा : पालघरमध्ये पुन्हा उसळली परप्रांतीयांची गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा