बंगळुरू - कर्नाटकच्या करवार किनारपट्टीवर उभ्या असलेल्या भारतीय नौदलाच्या विक्रमादित्य जहाजाला शुक्रवारी अचानक आग लागली. या आगीत लेफ्टनंट कमांडर डी. एस. चौहान यांचा गुदमरून मृत्यू झाला. चौहान हे आगीवर ताबा मिळवण्यासाठी धडपड करत होते.
आग विझवताना चौहान बेशुद्ध झाले होते. त्यानंतर त्यांना जवळच्या नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तेथे त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात विषारी धूर साचल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज डॉक्टरांनी लावला आहे.
या घटनेनंतर भारतीय नौदलाने तपासाचे आदेश दिले आहेत. सध्या जहाजावर लागलेल्या आगीवर ताबा मिळवण्यात यश आले आहे. सध्या जहाजाला किती नुकसान झाले, हे अद्यापही समोर आलेले नाही.
यापूर्वीही २०१६मध्येही आयएनएस विक्रमादित्य आगीचे भक्ष्य ठरले होते. त्यावेळी नौदलाच्या २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. आयएनएस विक्रमादित्य तब्बल ४५ दिवस समुद्रात राहू शकते. त्यावर लढाऊ विमानांसाठी २८४ मीटर लांब आणि ६० मिटर रुंद धावपट्टीची व्यवस्था आहे. या जहाजाचा आकार फुटबॉलच्या ३ मैदानाएवढा आहे.
यावर एकूण ३० लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर तैनात केले जाऊ शकतात. विक्रमादित्यावर एकूण २२ डेक आहेत. एकावेळी १६०० पेक्षा जास्त सैनिक यावर तैनात करता येतात. यावर लागलेल्या जनरेटरमुळे १८ मेगावॅट विज उत्पन्न केली जाते. यामध्ये समुद्राचे पाणी स्वच्छ करून पिण्यायोग्य बनवण्यासाठी ऑस्मॉसिस प्लांटही बसवण्यात आला आहे.