बंगळुरू - यशवंतपूरच्या त्रिवेणी रोडच्या कडेला असलेल्या कचरापेटीत एक पुरुष जातीचे नवजात अर्भक सापडल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एका ऑटो चालकामुळे या चिमुकल्याला जीवदान मिळाले आहे.
त्रिवेणी रस्त्यावरुन जात असताना एका ऑटोचालकाला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्याने ऑटो थांबवून आसपासच्या परिसरात शोध घेतला, असता कचरापेटीत एक नवजात अर्भक आढळून आले. त्याने याबाबत पोलिसांना सूचना केली आणि बाळाला कचरापेटीतून बाहेर काढून एका कापडात गुंडाळून सामान्य रुग्णालयात दाखल केले. सध्या या बाळावर रुग्णालयात उपचार सुरू असून या अर्भकाचे वजन खूपच कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून, त्याच्या पालकांनी त्याला कचरापेटीत टाकून पळ काढल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलीस आणि डॉक्टरांनी या अर्भकाचे जीव वाचवणाऱ्या ऑटो चालकाचे कौतुक केले आहे. तर, त्रिवेणी परिसरातील ज्या कचरापेटीत हे अर्भक सापडले तेथील परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस या अर्भकाच्या पालकाचा शोध घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.