बालसोर (ओडिशा) - पूर्णत: भारतीय बनावटीच्या पृथ्वी -2 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी बुधवारी (23 सप्टेंबर) बालसोरच्या लष्करी तळावर पार पडली. पृथ्वी -2 हे अण्विक क्षेपणास्त्र असून जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची त्याची क्षमता आहे. ओडिशातील लष्कराच्या तळावर या क्षेपणास्त्राची चाचणी पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठरलेल्या मापदंडांनुसार या क्षेपणास्त्राने रात्रीच्या वेळी सर्व चाचण्या पूर्ण केल्या असून लवकरच त्याचा लष्करात समावेश होणार आहे. चांदीपूरच्या इंटिग्रेटेड रेंंजवर याची मारक क्षमता आजमावण्यात आल्याचे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले. पृथ्वी -2 हे क्षेपणास्त्र 350 किमीपर्यंत अचून लक्ष्य भेदू शकते, अशी माहिती डिआरडिओच्या अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये वापरण्यात येणारे संपूर्ण तंत्रज्ञान भारतीय बनावटीचे असल्याचे त्यांनी सांगितले.
ओडिशाच्या किनारपट्टीवरील रडार सिस्टिम तसेच इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टिम आणि डिआरडिओच्या टेलिमेंट्री स्टेशन्सने या क्षेपणास्त्राच्या चाचणीचे निरीक्षण केले. स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडच्या वतीने हे क्षेपणास्त्र एकूण साठ्यातून ऐच्छिक पद्धतीने निवडण्यात आले; आणि डिआरडिओच्या संयुक्त विद्यमाने ही सराव चाचणी पार पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी निरीक्षणासाठी काही वैज्ञानिकांनीही उपस्थिती लावल्याची माहिती आहे.