बंगळुरू : कर्नाटकात असणारे देशातील सर्वात मोठे कोविड केअर सेंटर हे बंद होण्याच्या मार्गावर आहे. बंगळुरूच्या इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटरमध्ये उभे करण्यात आलेल्या या केअर सेंटरमध्ये १० हजार १०० खाटांची सोय आहे. पुरेसे रुग्ण नसल्यामुळे १५ सप्टेंबरपासून हे सेंटर बंद करण्यात येणार आहे.
कोरोना केअर सेंटर टास्क फोर्सचे प्रमुख राजेंद्र कुमार कटारिया यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार हे सेंटर बंद करण्याचा निर्णय बंगळुरू प्रशासनाने घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात या कोविड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत मजूरांना ठेवण्यात आले होते.
हे कोविड सेंटर बंद झाल्यानंतर यामधील फर्निचर आणि खाटा या सरकारी आणि विद्यापीठांच्या वसतीगृहांना देण्यात येणार आहेत. राज्याच्या समाजकल्याण विभागाला यातील २,५०० खाटा देण्यात येणार आहेत. तसेच, बागलकोट हॉर्टिकल्चर विद्यापीठ वसतीगृह, अल्पसंख्याक कल्याण विभागाचे वसतीगृह आणि जीकेव्हीके यांनाही काही प्रमाणात खाटा देण्यात येणार आहेत.
हेही वाचा : गेल्या २४ तासांमध्ये ७५ हजार कोरोनाग्रस्तांची नोंद; देशातील रुग्णसंख्या ४२ लाख ८० हजारांवर