रायपुर - छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये देशातील पहिला 'गार्बेज कॅफे' सुरू करण्यात आला आहे. छत्तीसगडचे आरोग्यमंत्री टी. एस. सिंघदेव यांनी बुधवारी या कॅफेचे उद्घाटन केले. या कॅफेच्या माध्यमातून प्लास्टिक कचऱ्याच्या बदल्यात नगरपालिकेकडून लोकांना अन्न पुरवण्यात येणार आहे.
रिसायकल करता येण्याजोगे एक किलो प्लास्टिक घेऊन येणाऱ्या व्यक्तीला एका वेळचे जेवण, तर ५०० ग्रॅम प्लास्टिक आणल्यास एक वेळचा नाश्ता दिला जाणार आहे. शहराच्या मुख्य बस स्थानकात हा कॅफे सुरु करण्यात आला आहे.
अंबिकापूर हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात स्वच्छ शहर आहे. या कॅफेमधून गोळा होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचा वापर रस्ते बांधण्यासाठी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. केवळ डांबर वापरुन तयार झालेल्या रस्त्यांपेक्षा प्लास्टिक आणि डांबराचे मिश्रण वापरून करण्यात आलेले रस्ते हे जास्त टिकाऊ असतात.
पर्यावरण संवर्धनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्लास्टिक बंदीची घोषणा करत आहेत, मात्र जे प्लास्टिक आधीपासून आहे त्याचा पुनर्वापर करणेदेखील गरजेचे आहे.
हेही वाचा : देवरगट्टू लाठीयुद्ध : देवतांचा विवाह साजरा करणारा रक्तरंजित उत्सव!