नवी दिल्ली - भारत चीनमध्ये मागील काही दिवसांपासून सीमावाद चिघळलेला आहे. पूर्व लडाखमधील हिंसाराचानंतर तणाव कमी करण्यासाठी बैठका सुरू आहेत. मात्र, अद्याप कोणताही तोडगा निघाला नसून दोन्ही देशांचे सैन्य सतर्क आहेत. भारताच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण माहिती गोळा करणाऱ्या एमीसॅट (EMISAT) या उपग्रहाने नुकतेच चीनमधील तिबेटची पाहणी केली आहे. या भागातील चिनी लष्कराच्या हालचाली भारताला टिपता आल्या आहेत, असे सुत्रांनी सांगितले.
भारताच्या या उपग्रहावर कौटिल्य नामक इलेट्रॉनिक निगराणी प्रणाली (ELINT) बसविण्यात आली आहे. लष्करी रणनितीसाठी या उपग्रहाद्वारे महत्त्वपूर्ण माहिती जमा करण्यात येते. अरुणाचल प्रदेशजवळील तिबेटमध्ये चिनी लष्कराची स्थिती उपग्रहाने जमा केली आहे. डीआरडीओने या उपग्रहाची निर्मिती केली असून शुत्रूच्या भागातील महत्त्वपूर्ण माहिती रेडिओ सिग्लद्वारे नोंदवता येते.
भारत आणि चीनच्या लष्करामध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु असताना भारताच्या उपग्रहाने या भागातून माहिती जमा केली आहे. डेपसांग भागात चिनी सैन्य नियंत्रण रेषेच्या पलीकडे खोदकाम करत असून लष्कराच्या हालचाली वाढल्याचे उपग्रहाद्वारे समजल्याचे सुत्रांनी सांगितले.
शुक्रवारी भारतातीय उपग्रहाने आफ्रिका खंडातील हॉर्न ऑफ आफ्रिका या भागातील दिजिबूती येथील चिनी नौदलाच्या तळाची उपग्रहाद्वारे पाहणी केली. चीनचा देशाबाहेरील हा पहिला नौदल तळ आहे. दिजिबूती किनाऱ्यावर चीनच्या तीन युद्धनौका असल्याची माहिती काही दिवसांपुर्वी समोर आली होती. 11 जुलैला प्रोजेक्ट कौटिल्य उपग्रहाने पाकिस्तानच्या ओरमारा नौदल तळाची पाहणी केली. या तळावर नुकतेच चीनच्या पाणबुड्या आल्या होत्या अशी माहितीही भारताला मिळाली आहे.