मॉस्को - भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आज (बुधवारी) रशियाचे परराष्ट्रमंत्री सेरगी लावरोव यांची मॉस्कोमध्ये भेट घेणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनेक द्विपक्षीय सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या भेटीमधून मोदींच्या आगामी रशिया दौऱ्यासाठी वातावरण निर्मिती केली जात आहे.
एस. जयशंकर आणि सेरगी लावरोव दोन्ही देशांमधील प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. व्यापार, गुंतवणूक, लष्कर, विज्ञान तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधन या क्षेत्रांमध्ये सहकार्याबाबत चर्चा होणार आहे.
वाचा- G-7 summit 2019: ...म्हणून 'जी-७ परिषद' भारतासाठी महत्त्वाची
आगामी काळात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेचे अध्यक्षपद रशियाकडे आहे. या परिषदेबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. तसेच इराणचा आण्विक कार्यक्रम पुढे नेण्यासाठी संयुक्तपणे काम करण्यावर चर्चा होणार आहे. याबरोबरच अफगाणिस्तानमधील सद्यस्थितीवरही दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार आहे.
वाचा- भारतासोबत चर्चेतून कमी करा तणाव, ट्रम्प यांनी इम्रान यांना फटकारले
रशियामध्ये सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या इस्टर्न इकॉनॉमिक फोरम (ईईएफ) या परिषदेचे पंतप्रधान मोदी प्रमूख पाहुणे असणार आहेत. ४ ते ६ असे तीन दिवस ही परिषद होणार आहे. मोदींच्या या दौऱ्यासाठी भारत आणि रशियाने आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे.
परराष्ट्रमंत्रीपदचा कार्याभार हाती घेतल्यानंतर एस. जयशंकर यांची ही पहिलीच रशिया भेट आहे. या भेटीदरम्यान रशिया आणि भारत दोन्ही देशांच्या 'इंटरव्हर्नमेंट कमिशमन'ची ही ते बैठक घेणार आहेत.