नवी दिल्ली - भारत-चीनदरम्यान झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान हुतात्मा झाले असून दोन्ही देशादरम्यान सध्या तणावाचे वातावरण आहे. चीनच्या हल्ल्याविरूद्ध भारताने लडाख प्रदेशात अतिरिक्त 30 हजार सैन्य तैनात केले आहे. भारतीय सैन्य अति थंड वातावरणात तैनात असल्याने तंबूची गरज भासू लागली आहे. तंबूसाठी भारतीय सेना आपत्कालीन आदेश देणार आहे.
भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव हा सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत राहू शकतो. जरी चीनचे सैनिक त्या ठिकाणाहून माघारी गेले. तरी आपण खबरदार राहणे गरजेचे आहे. म्हणूनच पूर्वीच्या लडाख क्षेत्रात थंड हवामानात तैनात राहण्यासाठी हजारो तंबू मागवणार आहोत, अशी माहिती लष्कराच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.
सीमावर्ती भागातील शस्त्रे आणि दारूगोळा वगळता आमचे आपत्कालीन खरेदीचे मुख्य लक्ष सैनिकांना वस्ती उपलब्ध करुन देण्यावर असेल, असेही ते म्हणाले.
चीनच्या सैनिकांनी हिवाळ्यासाठी विशेष तंबू बसविणे सुरू केले आहे. भारताकडून असे तंबू सियाचीन ग्लेशियरवर उभारले जातात. सध्या आम्हाला मोठ्या प्रमाणात तंबूंची गरज आहे. तंबूसाठी लष्कर भारतीय आणि युरोपियन अशा दोन्ही बाजारपेठांवर लक्ष ठेऊन आहे. कारण, अति थंड हवामान येण्यापूर्वी तंबू खरेदी करण्यावर भर देण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शस्त्रे, दारूगोळा आणि अधिवासातील कोणत्याही कमतरतेवर मात करण्यासाठी संरक्षण दलाला प्रत्येक खरेदीसाठी 500 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिलेली आहे.