श्रीनगर - भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरातील कुपवाडा जिल्ह्यात सीमेजवळ पाकिस्तानी 'क्वॉडकॉप्टर' खाली पाडले. जिल्ह्यातील केरेन सेक्टरमध्ये पाकिस्तानी क्वाडकॉप्टरने भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. त्यामुळे भारतीय लष्कराने सकाळी आठ वाजता त्याला खाली पाडले.
चिनी बनावटीचं क्वाडकॉप्टर
'भारतीय लष्कराने सकाळी आठ वाजता केरेन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी लष्कराचे क्वॉडकॉप्टर खाली पाडले. हे क्वॉडकॉप्टर चिनी बनावटीचे असून DJI Mavic कंपनीचे आहे. भारतीय हद्दीत प्रवेश केल्यामुळे त्याला खाली पाडण्यात आले, असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.
घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांना मदत करत असल्याने भारतीय लष्कर सतर्क झाले आहे. सीमेवरील भारतीय चौक्यांना पाकिस्तानच्या विशेष सैन्य पथकाकडून आणि बॉर्डर अॅक्शन टीमकडून लक्ष्य करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर सतर्क झाले आहे.
पाकिस्तानचा कुटिल डाव
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानी लष्कर मदत करत आहे. हा त्यांचा कुटिल डाव आहे. मात्र, भारतीय लष्कराने त्यांचे हे प्रयत्न उधळून लावले आहेत, असे भारतीय लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.