नवी दिल्ली - अमेरिकन कंपनी बोईंगने अपाचे हेलिकॉप्टर्सची पहिली बॅच आज (शनिवारी) भारतीय वायुसेनेला सोपवली आहे. बोईंग कंपनी भारतीय वायुसेनेला एकूण २२ अपाचे हेलिकॉप्टर्स ४ टप्पात पुरवणार आहे. हिंदाण हवाईतळ, उत्तरप्रदेश येथे ४ एएच-६४ई अपाचे हेलिकॉप्टर्सची पहिली बॅच पोहोचवण्यात आली आहे.
बोईंगने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेला पहिली बॅच पोहोचवण्यात आली आहे. पुढील आठवड्यात अजून ४ हेलिकॉप्टर्सची बॅच पोहोचवण्यात येणार आहे. भारतीय वायुसेनेसोबत केलेल्या करारानुसार नवीन अपाचे हेलिकॉप्टर्समध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आली आहे. यामुळे कोणत्याही कठीण परिस्थितीशी सामना करण्यासाठी हेलिकॉप्टर्स तयार आहेत. २०२० पर्यंत भारतीय वायुसेनेला सर्व २२ हेलिकॉप्टर्स मिळणार आहेत.
भारतीय वायुसेनेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, वायुसेनेच्या गरजेनुसार अपाचे हेलिकॉप्टर्समध्ये अत्याधुनिक सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे वायुसेनेच्या ताकदीत भर पडणार आहे.
२०१५ साली भारताने २२ हेलिकॉप्टर्ससाठी बोईंग कंपनीसोबत कोट्यवधींचा करार केला होता. यानंतर, संरक्षण मंत्रालयाने २०१७ साली ६ अपाचे हेलिकॉप्टर्स आणि अत्याधुनिक शस्त्रप्रणालीसाठी ४ हजार १६८ कोटींचा करार केला होता. बोईंग कंपनीने आतापर्यंत १४ देशांना २२०० अपाचे हेलिकॉप्टर्सचा पुरवठा केला आहे. अपाचे हेलिकॉप्टर विकत घेणारा भारत चौदावा देश आहे.