नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशातील रुग्णांच्या संख्येने ५ लाखांचा आकडा पार केला आहे. यात मागील २४ तासांमध्ये तब्बल १८ हजार ५५२ नव्या रुग्णांची भर पडली आहे, आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात २४ तासांमध्ये १८ हजार ५५२ नवे रुग्ण आढळले. तर ३८४ जणांचा यामुळे मृत्यू झाला. नव्या रुग्णांच्या संख्येसह देशातील रुग्णांची संख्या ५ लाख ८ हजार ९५३ इतकी झाली आहे. यात १ लाख ९७ हजार ३८७ अॅक्टिव्ह आहेत. तर २ लाख ९५ हजार ८८१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत १५ हजार ६८५ जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रामध्ये मागील २४ तासांमध्ये तब्बल ५ हजारहून अधिक रुग्ण आढळले. नव्या ५ हजार २४ रुग्णांसह महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण संख्या दीड लाखावर पोहोचली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात १ लाख ५२ हजार ७६५ रुग्ण आढळले. यात अॅक्टिव्ह रुग्ण ६५ हजार ८२९ इतके आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहे. फक्त एकट्या मुंबईत ७२ हजार १२५ रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रासह दिल्ली आणि तमिळनाडू राज्यात सर्वात जास्त कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.
हेही वाचा - उत्तर प्रदेशमध्ये विद्यार्थी नेत्यावर गावठी बॉम्ब हल्ला, तिघे जखमी
हेही वाचा - लष्करप्रमुख आणि राजनाथ सिंह यांची बैठक; लडाख सीमेवरील सद्य स्थितीचा घेतला आढावा