नवी दिल्ली - आज १५ ऑगस्ट.. भारत स्वांतत्र्यांच्या ७३ व्या वर्षात पदार्पण करत आहे. स्वांतत्र्य संग्रामामध्ये अनेकांनी बलिदान दिले. त्यांनतर सार्वभौम राष्ट्र म्हणून भारत जन्माला आला. मात्र, स्वांतत्र्य मिळाल्यानंतरही देशासमोरच्या अडचणी संपल्या नाहीत. चीन आणि पाकिस्तान हे शेजारील देश कायमच भारताविरुद्ध कुरघोड्या करत आहेत. त्याचा इतिहास फार जुना आहे, आजही ही दोन राष्ट्रे भारताच्या विरोधात आघाडी उघडून बसले आहेत. आत्तापर्यंत भारताने चीन बरोबर १ आणि पाकिस्तानबरोबर ४ लढाया केल्या. त्याचा हा थोडक्यात इतिहास...
१९४७ - १९४८ पाकिस्तानची काश्मीरमध्ये घुसखोरी
१९४७ साली भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. त्यावेळी भारतामध्ये ५६५ संस्थाने अस्तित्त्वात होती. यातील जुनागड, हैदराबाद आणि काश्मीर सोडता सर्व संस्थानांनी भारत किंवा पाकिस्तानमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. जुनागड आणि हैदराबादवर पोलीस कारवाई करत भारतीय संघराज्यात सहभागी करुन घेण्यात आले. मात्र, जम्मू-काश्मीर संस्थानाने कोणताही निर्णय घेतला नव्हता. तेथील प्रजा मुस्लीमबहुल होती. तर राजा हिंदु होता. भारतात किंवा पाकिस्तानात सहभागी होण्याचा प्रस्ताव नाकारत स्वतंत्र राहण्याचा मानस तत्कालीन राजा हरिसिंग यांचा होता.
तर पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जीना काश्मीर पाकिस्तानमध्ये विलीन करण्यासाठी आग्रही होते. उघडपणे काश्मीरवर हल्ला करता येत नसल्याने पाकिस्तानने कबायलींकरवी (आदिवासी घुसखोर) काश्मीरमध्ये हल्ला करण्यास सुरुवात केली. काश्मीरच्या दिशेने कबायली कूच करत असताना राजा हरिसिंगचे धाबे दणाणले. जाळोपोळ आणि लूटमार करत घुसखोरांनी पश्चिम काश्मीरमध्ये धुमाकुळ घातला होता. त्यामुळे राजा हरिसिंगने भारत सरकारकडे मदतीची याचना केली. मात्र, भारतामध्ये सामील होण्याच्या करारावर सही केल्याशिवाय मदत करणार नसल्याचे भारताने स्पष्ट केले. त्यानुसार काश्मीरच्या राजाने भारतामध्ये सहभागी होण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. त्यानंतर भारतीय लष्कराने कबायलींना काश्मीरमधून पिटाळून लावले. दरम्यान, पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंनी मध्येच युद्धबंदीची घोषणा केली. गिलगिट बालटिस्तान, अक्साई चीन, बलुचिस्तान हा प्रांत पाकिस्ताकडे राहिला. तर उर्वरित काश्मीर भारताच्या ताब्यात राहिला.
भारत चीन युद्ध (इंडो- चायना वॉर) १९६२
हिंदी-चीनी भाई-भाई अशा घोषणा स्वांतत्र्यानंतर भारतात दिल्या गेल्या. मात्र, चीनने भारताच्या पाठीत खंजिर खुपसला. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याच दरम्यान चीन एक बलाढ्य राष्ट्र म्हणून पुढे येत होते. ब्रिटीश इंडिया आणि चीनमध्ये झालेल्या करारानुसार अरुणाचल प्रदेशमधील मॅकमोहन लाईन भारत आणि चीनमधील सीमारेषा असल्याचे निश्चित झाले होते. मात्र, ही सीमा रेषा मान्य करायला चीन तयार नव्हता. १९५० साली चीनने तिबेटला गिळंकृत केल्यानंतर भारत आणि चीन आमने-सामने ठाकले. पश्चिमेकडे जम्मू-काश्मीरपासून पूर्वेकडील अरुणाचल प्रदेशपर्यंत भारताची सीमा चीनशी जोडली गेली.
भारताने मॅकमोहन सीमेवर सैन्य तैनात केल्यानंतर चीनचा पारा चढला. तसेच भारताने तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा यांना आश्रय दिल्यामुळे चीन चिडला होता. २० ऑक्टोबर १९६२ ला चीनी सैन्याने भारताच्या विरोधात युद्ध पुकारले. अतिशय तुटपुंजी संसाधने आणि युद्ध तयारी नसताना भारत युद्धाला सामोरे गेले. चीनने तवांग, चुशुल, रेजांगला या भागांमध्ये कब्जा केला. भारतीय सैन्य निकराने लढा देत होते. १९ नोव्हेंब १९६२ ला चीनने युद्धबंदीची घोषणा केली. मात्र, अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेशचा काही भूभाग भारताच्या ताब्यातून निसटला.
भारत पाकिस्तान १९६५ युद्ध
१९६२ साली चीनशी झालेल्या युद्धानंतर भारताची आर्थिक परिस्थितीही हालाखीची झाली होती. देशामध्ये महागाई वाढली होती. भारताच्या कमजोर स्थितीचा फायदा उचलण्याचं पाकिस्तानने ठरवलं.
जम्मू-काश्मीरवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानने 'ऑपरेशन जिब्राल्टर'ची योजना आखली. पाकिस्तानने साध्या वेशातील सैन्य काश्मीरमध्ये धाडले. काश्मीरी नागरिकांनीच हा उठाव केला आहे, असे भासवून पाकिस्तानला काश्मीरवर ताबा मिळवायचा होता. घुसखोरांनी काश्मीरवर हल्ला केला. टिथवाल, उरी आणि पुंछ जिल्ह्यातील भाग पाकिस्तानने ताब्यात घेतला. मात्र, त्यानंतर भारताने जोरदार हल्ला करत पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये ८ कि. मी आतमध्ये भारताचा झेंडा फडकावला.
काश्मीरमध्ये युद्ध सुरू असताना भारताने पश्चिमेकडील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत पंजाब आणि राजस्थानमार्गे पाकिस्तानवर हल्ला केला. भारतीय सीमा सहजतेने पाकिस्तानमध्ये घुसली. लाहोरपर्यंत भारताने मजल मारली. यावेळी दोन्ही देशामध्ये अनेक भागामध्ये झालेल्या लढाया गाजल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर या युद्धात प्रथमच रणगाड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. भारताने सियालकोट, लाहोर आणि काश्मीरमधील क्षेत्रावर कब्जा मिळवला. भारताने ७१० वर्ग कि. मी पाकिस्तानी क्षेत्रावर कब्जा मिळवला होता. संयुक्त राष्ट्राने युद्ध बंदीची घोषणा केल्यावर दोन्ही देशातील युद्ध थांबले.
१९७१ भारत पाकिस्तान यु्द्ध -
१९७१ सालच्या युद्धामध्ये भारताने पाकिस्तानचा भूगोल बदलून टाकला. त्यावेळी पाकिस्तान भारताच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही सीमांवर होता. पश्चिम पाकिस्तान पूर्व पाकिस्तानातील नागरिकांना राजकीय हक्क नाकारत होता. मात्र, पाकिस्तान विरोधी चळवळ दडपून टाकत होते. त्या वादामध्ये हजारो शरणार्थी भारतामध्ये दाखल होत होते. त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडत होता. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीनी स्वतंत्र बांग्लादेश निर्माण करण्याचा विडा उचलला.
पुर्व पाकिस्तानमध्ये मुक्ती वाहिनी संघटना पाकिस्तानच्या लष्कराशी लढत होती. तिला भारताने मदत करायला सुरुवात केली. दरम्यान, पाकिस्तानने भारताच्या हवाई तळांवर हल्ला केला. भारताने ३ डिसेंबरला युद्धाची घोषणा केली. अवघ्या १३ दिवसांमध्ये भारताने पाकिस्तानला नेस्तनाबूनत केले. पूर्व पाकिस्तानमध्ये भारतीय सैन्याला विजय मिळाला. स्वंतत्र बाग्लांदेश जगाच्या नकाशावर अस्तित्वात आला. पाकिस्तानचे ९३ हजार सैन्य भारताला शरण आले. त्यानंतर झालेल्या शिमला करारानुसार पाकिस्तानने बांग्लादेशाला मान्यता दिली. त्याच्या बदल्यात भारताने पाकिस्तानचे बंदी केलेले सैन्य सोडले.
कारगिल युद्ध १९९९ -
अतिउंचावर लढले गेलेले युद्ध म्हणून कारगिल युद्धाकडे पाहिले जाते. मे १९९९ ते जुलै १९९ या काळात कारगिल युद्ध लढले गेले. हिवाळ्यामध्ये अतिऊंच पहाडी भागामध्ये तापमाण उणे ४० अंश सेल्सिअसपर्यंत जाते. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानी सैन्य चौक्या साडून माघारी परतते. परत हिवाळा संपला की उन्हाळ्यामध्ये पुन्हा चौक्यांचा ताबा घेते. मात्र, पाकिस्तानी घुसखोरांनी हिवाळाण्यात कारगिल क्षेत्रातील भारतीय चौक्यांवर कब्जा करुन ठेवला. या घुरखोरीची भारताला कल्पनाही नव्हती. श्रीनगर- लेह महामार्ग ताब्यात घेण्याचा पाकिस्तानी घुसखोरांचा डाव होता. कारगिलच्या ऊंच शिखरांवरुन पाकिस्तानी सैन्य भारतावर हल्ला करत राहीले. ऊंच स्थानावर असल्याने पाकिस्तानला भौगोलिक दृष्या फायदा मिळत होता.
भारताने ऑपरेश विजय राबवत पाकिस्तानी घुसखोर सैन्यांना काश्मीर खोऱ्यातून पिटाळून लावण्याचे नियोजन आखले. तोलोलिंग आणि टायगर हिल या महत्त्वाच्या लढाया झाल्या. सर्वप्रथम भारताने तोलोलिंगवर ताबा मिळवला. भारतीय हवाई दलाने असामान्य असे कौशल्य दाखवत 'लेझर गाईडेड' बॉम्बने डोंगराळ भागात लपलेल्या पाकिस्तानी सैन्याला लक्ष बनवले. युद्धाचा शेवट भारताच्या विजयाने झाला. पाकिस्तानी घुसखोरांना कारगिलमधून पिटाळून लावण्यात भारताला यश आले. या युद्धामध्ये भारताचे पाचशे पेक्षा जास्त जवान हुतात्मा झाले. कारगिल युद्धानंतर भारताने संरक्षण सज्जतेसाठी मोठ्या रकमेची तरतूद केली.