नवी दिल्ली - अमेरिका आणि तालिबानदरम्यान होणाऱ्या शांतता करारावर शनिवारी स्वाक्षऱ्या करण्यात येणार आहेत. या समारंभाला भारताचा प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहे. कतारमधील भारतीय राजदूत हे दोहामध्ये होणाऱ्या या समारंभाला भारताचे प्रतिनिधित्व करतील. 'तालिबान'चा सहभाग असणाऱ्या एखाद्या कार्यक्रमाला अधिकृतरित्या उपस्थित राहण्याची भारताची ही पहिलीच वेळ असणार आहे.
तब्बल १८ महिन्यांच्या चर्चेनंतर, अखेर अमेरिका आणि दहशतवादी संघटनांमध्ये एक करार अस्तित्वात येत आहे. या कराराद्वारे हे निश्चित केले जाणार आहे, की युद्धग्रस्त देशांमधून परदेशी (विशेषतः अमेरिकी) सैन्य हटवण्यात येईल. याबदल्यात, अफगाणमधील जमिनीचा वापर इतर कोणत्याही देशाविरोधात होणार नाही, यास तालिबानने संमती दर्शवली आहे.
शनिवारी या करारावर स्वाक्षरी करण्याचा समारंभ पार पडेल. साधारणपणे चोवीसहून अधिक देशांचे प्रतिनिधी या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कतार सरकारने भारताला या स्वाक्षरी समारंभाचे निमंत्रण दिले आहे. त्यानुसार, कतारमधील भारताचे राजदूत पी. कुमारन हे या समारंभाला उपस्थित राहतील.
२०१८मध्ये मॉस्कोत पार पडलेल्या अफगाण शांतता प्रक्रियेवरील परिषदेसाठी भारताने अनधिकृत क्षमतेमध्ये दोन माजी मुत्सद्यांना पाठवले होते. हा तेव्हाचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय होता. रशियाने आयोजित केलेल्या या परिषदेला उच्चस्तरीय तालिबानी प्रतिनिधीमंडळ, अफगाणिस्तानचे प्रतिनिधी तसेच अमेरिका, पाकिस्तान, चीन आणि इतर काही देशांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
हेही वाचा : दहशतवादाला आळा घालण्यासाठी पाकिस्तानवर दबाव कायम ठेवणे गरजेचे, भारताचा अमेरिकेला सल्ला