नवी दिल्ली - भारतामध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. देशभरामध्ये आत्तापर्यंत ६८ रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर भारत सरकराने कडक निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. परदेशी नागरिकांचे सर्व पारपत्र (व्हिजा) भारताने १५ एप्रिलपर्यंत रद्द केले आहेत. तसेच देशाच्या सीमाही बंद केल्या आहेत. केंद्रीय स्तरावर आरोग्य मंत्री अनेक बैठका घेत असून परिस्थितीवर बारकाईने नियंत्रण ठेवत आहेत.
हेही वाचा - जगभर पसरलेला कोरोना 'साथीचा रोग', जागतिक आरोग्य संघटनेची घोषणा
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी साथीचा आजार कायदा १८९७ मधील तरतुदी लागू करण्याचा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे. त्यानुसार राज्य सरकार नियमावली जारी करू शकते. राजनैतिक अधिकारी आणि इतर ठराविक संघटनांचे अधिकारी वगळता व्हिजा १५ एप्रिल २०२० पर्यंत रद्द करण्यात आला आहे. १३ मार्चपासून हा निर्णय लागू होणार आहे. 'व्हिजा फ्री' प्रवेश असणाऱ्या भारतीय वंशाच्या(ओव्हरसीस इंडियन) नागरिकांना दिली जाणारा सुविधाही थांबविण्यात आली आहे.
हेही वाचा - दुबईहून तेलंगणात परतलेला 'तो' रुग्ण कोरोना निगेटीव्ह, दहा दिवसांपूर्वी होता पॉझिटीव्ह
कोरोना आजार नियंत्रणात आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्रीगटाच्या आढावा बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून प्रशासकीय सज्जतेवर चर्चा करण्यात आली. भारतीय अर्थव्यवस्था आधीच मंदीत सापडलेली आहे. त्यात पर्यटकांना येण्यास बंदी केल्यामुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान होणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धाही पुढच्या महिन्यात सुरू होणार आहे. या स्पर्धेचे आयोजनही धोक्यात आले आहे. राज्य सरकारांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती अभियानही राबवण्यात येत आहे.
हेही वाचा - कोरोनाच्या भीतीमुळे एअर इंडियाची इटली, कोरियाला जाणारी विमानसेवा रद्द
१५ फेब्रुवारीनंतर सर्वाधिक कोरोनाचा प्रसार झालेल्या देशांतून भारतात आलेल्या नागरिकांना अलिप्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन, जर्मनी या देशांतून आलेले पर्यटक, भारतीय नागरिक यांना १४ दिवस अलिप्त ठेवण्यात येणार आहे. १३ मार्चपासून हा निर्णय लागू होणार आहे. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी द्यावी, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.