नवी दिल्ली - भारतामध्ये कोरोनाचा ससंर्ग झपाट्याने वाढत आहे. आत्तापर्यंत 8 हजार 447 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. संभाव्य रुग्णांची चाचणी घेण्याची संख्याही सरकारने वाढविली आहे. आज अखेरपर्यंत देशभरात 1 लाख 81 हजार 28 नागरिकांची कोरोना चाचणी घेतल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने सांगितले आहे.
एकूण 1 लाख 95 हजार 748 जणांचे वैद्यकीय नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 1 लाख 81 हजार 28 नागरिकांची चाचणी घेण्यात आली आहे. आज(रविवार) रात्री 9 वाजेपर्यंतची ही आकडेवारी असल्याचे आयसीएमआरने सांगितले आहे. चाचण्यांची संख्या वाढविल्याने देशात रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सुरुवातीला चाचण्या कमी प्रमाणात घेण्यात येत होत्या मात्र, आता दरदिवशी घेण्यात येणाऱ्या चाचण्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे.
भारतातील एकूण रुग्णांपैकी 20 टक्के रुग्णच अतिदक्षता विभागात असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. एकूण रुग्णांपैकी 20 टक्के म्हणजे 1 हजार 256 रुग्णांना ऑक्सिजनची गरज असून त्यांची अतिदक्षता विभागात काळजी घेण्यात येत आहे. ही आकडेवारी महत्त्वाची आहे, कारण यातून सरकारी तयारी दिसून येते असे संयुक्त सचिव लव अगरवाल आज पत्रकार परिषदेत सांगितले.
देशात 29 मार्चला फक्त 979 रुग्ण होते मात्र, आता हजार 447 रुग्ण संख्या झाली आहे. 9 तारखेच्या आकडेवारीनुसार जर आपल्याला 1 हजार 100 खाटांची गरज असेल तर आपल्याकडे 85 हजार खाटांची उपलब्धता आहे. आज जर आपल्याला 1 हजार 671 खाटांची गरज असेल तर आपल्याकडे 1 लाख 5 हजार खाटा कोरोनासाठी तयार करण्यात आलेल्या 601 रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत, अशी माहिती अगरवाल यांनी दिली.