नवी दिल्ली – चीनने कोणतीही आगळीक केली तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने उत्तर लडाखमध्ये तयारी सुरू केली आहे. चीनने लडाखमथील दौलत बेग ओल्डी (डीबीओ) आणि देपसाँगमध्ये 17 हजार सैनिकांच्या तुकडा आणि लढाऊ वाहने तैनात केली आहेत. त्यावर भारतानेही या भागात मोठ्या प्रमाणात सैनिकांच्या तुकड्या आणि रणगाडे तैनात केले आहेत.
सरकारी सूत्राने सांगितले, की डीबीओ आणि डेपसाँग भागातील समतल भागात आपण खूप प्रमाणात सैनिकांच्या तुकड्या आणि रणगाडे तैनात केले आहेत. त्यामध्ये टी-90 ही शस्त्र विभागाची बटालियनही तैनात केल्याचे सूत्राने सांगितले. सैन्यदलाने शस्त्रसज्जता अशी ठेवली आहे, की चीनला कोणतीही आगळीक करणे शक्य होणार नाही.
चीनने डीबीओ आणि डेपसाँग भागाच्या विरुद्ध दिशेने हालचाल केली तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कठीण डोंगर-पवर्तात लढणारी खास माउंटेन ब्रिग्रेड आणि आर्मर ब्रिगेड भारताने तैनात केली आहे. याचबरोबर 15 हजार सैनिकांच्या तुकड्या आणि अनेक रणगाड्यांच्या बटालियनही तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चीनकडून रस्ते आणि हवाई मार्गाने धोका झाल्यास हे आव्हान परतून लावणे शक्य होणार आहे.
चीनने भारताच्या भूभागात असलेल्या पीपी-7 आणि पीपी-8 भागात नाल्यावर छोटा पूल बांधला होता. मात्र, हा पूल भारतीय सैनिकांनी काही वर्षांपूर्वी उद्धवस्त केला होता, अशी सूत्राने माहिती दिली.
चीन-भारतामध्ये सीमारेषेनजीक असलेला तणाव कमी करण्यासाठी पाच फेऱ्या झाल्या आहेत. मात्र चीनने दिलेली वचनबद्धता आजवर पाळली नाही. चीनला फिंगर 5 या ठिकाणी टेहळणी नाका बांधण्याची इच्छा आहे. त्याला भारताने नकार देत एप्रिल-मे 2020 प्रमाणे जैसे थे परिस्थिती करण्याची चीनकडे मागणी केली.