नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील भारत आणि चीनसीमेवरील तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. कारण, चिनी लष्कराने दोन्ही देशांच्या बैठकीत ठरलेल्या निर्णयानुसार नियंत्रण रेषेवरून मागे जाण्यास नकार दिला आहे. नियंत्रण रेषेवरील काही भागात चीन ठाण मांडून बसला आहे. त्यामुळे आता सीमेवर दिर्घकाळ सज्ज राहण्यासाठी लष्कराने तयारी सुरु केली आहे. तीव्र हिवाळ्यात समुद्रसपाटीपासून उंचावर असलेल्या या कठीण भूभागात भारतीय लष्कर चीनला उत्तर देण्यासाठी तयारीला लागले आहे.
आणीबाणीच्या परिस्थितीत सीमेवरील सैनिकांना अन्न आणि इतर साहित्याचा पुरवठा करण्यासाठी लष्कराकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी 14 जुलैला कॉर्प्स कमांडर स्तरावरील लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीतील निर्णय लागू करण्यास चीन तयार नाही. त्यामुळे परिस्थितीत तणावपूर्ण झाली आहे.
चिनी सैनिक नियंत्रण रेषेवरून काही अंतर मागे गेले. मात्र, पुन्हा जेथे होते तेथे आले. त्यामुळे सीमेवरील परिस्थिती कायम पडताळून पाहण्याची गरज लष्कराने व्यक्त केली आहे. पँग्याँग त्सो आणि फिंगर फोर भागातून भारत आणि चीनचे सैन्य 2 किमी मागे सरकले असले तरी डोंगरकडा भागातून चिनी सैनिक मागे हटले नाही.
चिनी सैन्याने 8 किमी आत भारतीय भूभागात अतिक्रमण केले आहे. फिंगर फोरपर्यंत चिनी सैनिक तळ मांडून बसले आहे. मात्र, फिंगर 8 पासून भारत चीन नियंत्रण रेषा जाते असे भारताचे म्हणणे आहे. चीनची भूमिका पाहता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्कराला सज्ज राहण्यास सांगितले आहे. तसेच त्यांनी हवाई दलाची तयारी आणि इतर साधनसामुग्रीचा आढावा घेतला.