नवी दिल्ली - टपाल खात्याने आवश्यक वस्तूंच्या जलद वितरणासाठी पाचशे किलोमीटरच्या अंतर्गत येणाऱ्या 75 शहरांना जोडणाऱ्या 22 मार्गांची निश्चिती केली आहे. टपालवाहू गाड्या या मार्गांवर अत्यावश्यक गरजेच्या वस्तू जलद गतीने पोहोचवणार आहेत. याआधी या गाड्या पत्र-व्यवहार, पार्सल आदींसाठी शहरातल्या शहरात वापरल्या जात होत्या.
'रस्ते मार्गाने राष्ट्रीय पातळीवर पाचशे किलोमीटरच्या परिघात राज्यातल्या राज्यात आणि परराज्यात वाहतूक व्यवस्था केली जाणार आहे. यामुळे टपाल खात्याला आवश्यक वस्तूंचे वितरण देशभरात कुठेही करणे शक्य होणार आहे', असे निवेदन टपाल खात्याने दिले आहे.
'भारतीय टपाल विभागाने कोविड-19 चा फैलाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. सामान्य परिस्थितीत टपाल खाते वस्तूंच्या वितरणासाठी विमाने, रेल्वे गाड्या, मालवाहू विमाने यांचा वापर करते. याआधीही टपाल खात्याने औषधे, कोरोना विषाणू तपासणी किट्स, मास्कस्, सॅनिटायझर्स, पीपीई आणि व्हेंटिलेटर्स, डीफॅब्रीलेटर्स आदी वैद्यकीय उपकरणे देशाच्या काना-कोपऱ्यात पोहोचवण्यासाठी अनेक वेगवान पावले उचलली आहेत', असेही या निवेदनात म्हटले आहे.
'संपर्क आणि मानव संसाधन विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी शुक्रवारी टपाल खात्यासोबत झालेल्या बैठकीत वितरण व्यवस्थेसंबंधी विविध बाबींचा आढावा घेतला. त्यांनी टपाल खात्याच्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले. गुजरात, उत्तर प्रदेश, केरळ, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील राज्य टपाल विभागांनी आवश्यक वस्तूंच्या वितरणासाठी आत्तापर्यंत भारतीय औषध निर्माण संघटना, आरोग्य सेवा महासंचालक, ऑनलाईन फार्मास्युटिकल कंपन्या आणि तपासणी उपकरण पुरवठादार यांच्याशी विविध करार केले आहेत', असेही या निवेदनात सांगितले आहे.