इस्लामाबाद - शीख धर्मियांचे पवित्र स्थळ असलेले कर्तारपूर साहिब म्हणजेच गुरु नानक देव गुरुद्वारा भारतीयांसाठी खुला झाला आहे. चर्चेच्या अनेक फेऱ्या झडल्यानंतर गुरु नानक देव यांच्या ५५० व्या जयंती पूर्वी भारत-पाकिस्तानमध्ये करार झाला आहे. या करारानुसार ५ हजार भारतीयांना दररोज विना व्हिजा कर्तापरपूर साहीब गुरुद्वारामध्ये माथा टेकवण्यासाठी जाता येणार आहे.
१२ नोव्हेंबरला शिख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची ५५० वी जयंती आहे, त्याआधी कर्तारपूर कॉरिडॉर भाविकांसाठी सूरू करण्यात येणार आहे. औपचारिक कार्यक्रमामध्ये सध्या करारावर सह्या करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - कर्तारपूर सोहळ्याला मनमोहन सिंग 'कॉमन मॅन' म्हणून हजेरी लावणार; पाकची माहिती
लोकांच्या भावना लक्षात घेवून सुरू करण्यात आलेला हा प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. गुरुवारी कर्तारपूर कॉरिडॉर कशा पद्धतीने काम करेल याबाबतचा अंतिम करारावर दोन्ही देशांनी सह्या केल्या. भारत-पाक सीमेवरील 'झिरो लाईन' येथे करारावर सह्या करण्यात आल्या. भारतातर्फे अंतर्गत सुरक्षा सचिव एस. सी. एल दास आणि पाकिस्तानतर्फे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मोहम्मद फैजल यांनी प्रतिनिधित्व केले. करारावर सह्यांसाठी फक्त औपचारिक कार्यक्रम झाला असून पुढील महिन्यात दोन्ही देशांनी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
भारतातील ५ हजार शीख भाविकांना दररोज कर्तारपूर कॉरिडॉरने गुरु नानक देव गुरुद्वारा येथे जाता येणार आहे. मात्र, त्यासाठी भाविकांना २० डॉलर म्हणजे सुमारे दीड हजार रुपये मोजावे लागणार आहेत. हा प्रकल्प दोन्ही देशातील संबध वृद्धींगत करण्यासाठी राबवण्यात येत असल्यामुळे कोणतेही शुल्क आकारु नये, असे आवाहन भारताने पाकिस्तानला केले होते. मात्र, पाकिस्तान शुल्क आकारण्यावर अडून बसला आहे.
हेही वाचा - गुरु नानक पवित्र स्थळाकडे आता दुर्बीणीतून पाहायची गरज नाही - मोदी
शीखांचे पवित्र धर्मस्थळ गुरुद्वारा दरबार साहीब पाकिस्तानातील नुरवाला जिल्ह्यामध्ये असून, भारत पाकिस्तान सीमेपासून ४ कि.मी. पाकिस्तानच्या हद्दीत आहे. या ठिकाणी गुरुनानक यांनी १८ वर्षे वास्तव्य केले असून, त्यांनी अखेरचा श्वासही याच ठिकाणी घेतला. फाळणीनंतर हे पवित्र ठिकाण पाकिस्तानात गेल्याने भारतातील शीख धर्मीयांना या ठिकाणी जाण्यास अडचणी येत होत्या. गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंती निमित्त कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्धाटन करण्यात येणार असून, नोव्हेंबरमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. मागील वर्षापासून भारत व पाकिस्तान या प्रकल्पावर चर्चा करत होते.