श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरु करण्यात आलेली मोबाईल आणि इंटरनेट सेवा पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे. खोऱ्यात पसरवल्या जाणाऱ्या अफवांना थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच या सुविधा सुरु करण्यात आल्या होत्या.
तब्बल बारा दिवसांनी शुक्रवार आणि शनिवारी जम्मू, सांबा, कठुआ, उधमपूर आणि रियासी या जिल्ह्यांमध्ये कमी गतिची 2 जी सेवा देण्यात देण्यात आली होती. मात्र, जम्मूमध्ये पसरवल्या जाणाऱ्या अफवा रोखण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणार अनुच्छेद 370 हटवणे आणि दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक दिवस आधी म्हणजे 4 ऑगस्टला खोऱ्यातील मोबाईल व इंटरनेट सेवा बंद केल्या होत्या. त्यानंतर जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी खोऱ्यातील सर्व निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येतील, असे सांगितले होते. त्यानुसार शुक्रवारी पाच जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले होते. मात्र, सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांचा धोका लक्षात घेत पुन्हा एकदा सेवा बंद करण्यात आल्या आहेत.