नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताविरुद्ध केलेल्या भडकाऊ वक्तव्याचा परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी चांगलाच समाचार घेतला. आम्ही भारताविरुद्ध जिहाद पुकारला आहे. पाकिस्तानातील जनता फक्त सीमा ओलांडायची वाट पाहत आहे, असे इम्रान खान म्हणाले होते. हे वेडेपणाचे वक्तव्य असून इम्रान खान सरकार चालवण्यासाठी सक्षम नाहीत, असे रविश कुमार म्हणाले.
पाकिस्तानी नागरिक नियंत्रण रेषा ओलांडून भारतात येण्यास फक्त माझ्या घोषणेची वाट पाहत आहेत, असे इम्रान खान म्हणाले होते. एका शेजारी देशाने असे वागण बरोबर नाही. पाकिस्तानकडून चांगले वागण्याची अपेक्षाही नाही, मात्र, शेजारी देश असल्यामुळे ती अपेक्षा आम्ही ठेवतो. दुसऱ्या देशाच्या सार्वभौमत्त्वाचे उल्लंघन करणारे इम्रान खान यांचे वक्तव्य भडकाऊपणाचे आहे, असे कुमार म्हणाले.
संयुक्त राष्ट्राने जागतिक दहशवादी म्हणून घोषित केलेल्या हाफिज सईदला बँक खात्यातील पैसे वापरुन देण्यावरूनही कुमार यांनी पाकिस्तानवर टीका केली. एका आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याला खर्चायला पैसे देण्यासाठी पाकिस्तान संयुक्त राष्ट्राला पत्र लिहित आहे, यातून पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड होतो. जमात-उल-दवा संघटनेच मोऱ्हक्या हाफिज सईद २६ /११ च्या मुंबई हल्ल्यासाठी जबाबदार आहे. पाकिस्तान दहशतवाद विरोधी कारवाई करत असल्याचे खोटे सांगत असून दहशतवाद्यांना मदत करत आहे, असे कुमार म्हणाले.
काश्मीरची स्वायतत्ता काढून घेतल्यापासून पाकिस्तानची भारताविरोधात आगपाखड सुरू आहे. नुकत्याच संयुक्त राष्ट्र संघात झालेल्या आमसभेत इम्रान खान यांनी भारताविरोधात अणुयुद्ध करण्याची धमकी दिली. तसेच काश्मीरमधील परिस्थितीवरुन जगातील नेत्यांची दिशाभूल केली.