- शेतकरी आंदोलनाचा ३३वा दिवस; शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवरच सुरू केली शेती..
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचा आज ३३वा दिवस आहे. गेल्या ३२ दिवसांपासून हे शेतकरी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर बसून आहेत. आतापर्यंत झालेल्या चर्चांमधून कोणताही तोडगा निघाला नसल्यामुळे आता मंगळवारी पुन्हा शेतकरी आणि सरकार यांमध्ये चर्चा होणार आहे. दरम्यान, बुरारी मैदानावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी कांद्याची शेती सुरू केली आहे. यासोबतच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी दुभाजकामधील जागेतही शेती सुरू केली आहे.
- आजच्या दिवशी झाले होते पहिल्या चलतचित्राचे प्रदर्शन..
१८९५मध्ये ल्युमिअर बंधुंनी आजच्या दिवशी चलतचित्रांचे जाहीर प्रदर्शन केले होते. ही चलतचित्रे दीड मिनिटांची होती. रुळावरुन धावत एक आगगाडी स्थानकावर येत आहे. तसेच, एक माळी बागेला पाणी देत आहे अशा आशयांची ही चलतचित्रे होती. पॅरिस येथील एका कॅफेमध्ये यांचा पहिला 'शो' झाला होता. या घटनेला यावर्षी सव्वाशे वर्षे पूर्ण होत आहेत.
- बॉक्सिंग डे कसोटीचा तिसरा दिवस..
भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताकडे ८२ धावांची आघाडी आहे. पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ लवकर थांबवण्यात आला होता. त्यानंतर आज तिसऱ्या दिवसाचा खेळ होणार आहे.
- काँग्रेसचा आज १३६वा वर्धापन दिन..
काँग्रेस पक्षाचा आज १३६वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने काँग्रेस पक्षाकडून देशभरात ठिकठिकाणी तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, सेल्फी विथ तिरंगा अशी मोहीमदेखील काँग्रेसकडून राबवण्यात येणार आहे.
- 100 वी किसान रेल्वे सांगोल्यातून बंगालच्या शालीमारपर्यंत; पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सांगोला ते पश्चिम बंगालमधील शालीमारपर्यंत 100 व्या किसान रेल्वेस रवाना करणार आहेत. केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि पियुष गोयल हे या वेळी उपस्थित राहणार आहेत.
- देशातील पहिली चालक विरहित मेट्रो आजपासून धावणार..
देशातील पहिली चालक विरहीत मेट्रो आजपासून दिल्लीतील मॅजेंटा मार्गावर धावणार आहे. आज सकाळी ११ वाजता पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील.
- कोरोना लसीची पहिली खेप पोहोचणार दिल्लीत..
दिल्लीमध्ये आज कोरोना लसीची पहिली खेप पोहोचणार आहे. यासाठी राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ही लस ठेवण्यासाठी आवश्यक मशीन्सही पोहोचवण्यात आल्या आहेत. या मशीन्स जोडून कोल्ड चेन इक्विपमेंट बनवण्यात येणार आहेत, ज्यामध्ये ही लस साठवून ठेवता येईल.
- चार राज्यांमध्ये पार पडणार कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम..
आसाम, गुजरात, पंजाब आणि आंध्रप्रदेशमध्ये आजपासून कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम पार पडणार आहे. केंद्र सरकार या राज्यांमध्ये कशाप्रकारे लसीकरण राबवता येईल याचा आढावा घेईल. आज आणि उद्या (मंगळवार) ही मोहीम राबवली जाणार आहेय
- माओवाद्यांची ओडिसा बंदची घोषणा..
माओवाद्यांनी आज ओडिसा बंदची घोषणा केली आहे. माओवादी नेता सोनाली यांनी एका ऑडिओ संदेशाद्वारे याची माहिती दिली होती. एसओजी आणि डीव्हीएफच्या जवानांनी काही माओवाद्यांची हत्या केल्याचा आरोप कर, याचा आम्ही सूड घेऊ असेही सोनाली यात म्हणत आहेत.
- उद्योजक रतन टाटा यांचा आज वाढदिवस..
टाटा उद्योग समूहाचे मालक रतन नवल टाटा यांचा आज जन्मदिन आहे. टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी सुरत येथे झाला. त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण तसेच महाराष्ट्र भूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.